
चाकूर तालुक्यातील घरणीजवळील नळेगाव मोडवर भरधाव टिप्परने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. महामार्ग पोलीस ठाण्यासमोर हा अपघात घडला. मात्र, एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. तब्बल एक तास मृतदेह रस्त्यावर होता. त्यामुळे सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाच्या जवळील नळेगाव मोडवर हा अपघात झाला असून यात मोटरसायकलवरील अतुल राजकुमार कांबळे (वय 22, रा. आनंदवाडी, ता. रेणापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अतुल हा दुचाकीवरून लातूरकडे जात होता. नळेगाव येथून काळी माती घेऊन टिप्पर चाकूरकडे जात होता. भरधाव टिप्परने जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील अतुलचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस ठाण्यासमोर हा अपघात झाला. मात्र, तेथील पोलिसांना या अपघाताचे गांभीर्य लक्षात आले नाही. यामुळे तब्बल एक तास मृतदेह तसाच पडून होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची घटनास्थळी गर्दी झाली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांना दिली. त्यानंतर नळेगाव व चाकूर येथून पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्याकडे पाठविण्यात आला. महामार्गावरील रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून मागील नऊ दिवसात घरणी ते ममदापूरदरम्यान अपघातात जीव गमावण्याची ही तिसरी घटना आहे.



























































