शिर्डी पाठोपाठ श्रीक्षेत्र शनीशिंगणापूरचे शनी मंदिर भाविकांसाठी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्या नंतर आता श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर मंगळवार सायंकाळ पासुन भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुढीपाडवा व इतर धार्मिक कार्यक्रम  रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर, संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे आणि इतर दुकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती संस्थानने प्रसिद्धी पत्रक जारी करत दिले आहे.

प्रसिद्धीस पत्रकात म्हंटले आहे की, जगभरामध्ये कोरोना विषाणुंच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातील विषाणुबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद व एक सामाजिक जबाबदारी म्हणुन श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने नियोजित कार्यकम पुर्णतः रद्द केलेले आहेत. मंगळवार सायंकल 6:30 च्या आरतीपासुन संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय व शनिदेवाचे दर्शन पुढील प्रशासकीय आदेश येईपर्यत बंद राहाणार आहे. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे दर्शनार्थ येणा-या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील गर्दी नियंत्रणासाठी संस्थान प्रशासनासाठी सहकार्य करावे असे आवाहन विश्‍वस्त मंडळ, ग्रामपंचायत शनिशिंगणापूर व ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले आहे.

घोडेगाव-कुकाणा आठवडे बाजार बंद                          राज्यात प्रसिद्ध असलेला घोडेगांव येथील जनावरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील कुकाणा येथील बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.