
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायत, महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संभाजीनगर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच 31 मार्च रोजी मतदान होणाऱया ग्रामपंचायतींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंगळवारी अखेर जाहीर केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.





























































