
राजधानी दिल्लीत कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले असून सरकारने विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने देश-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ताजमहालसह लाल किल्ला, राजघाट, कुतुबमिनार तसेच इतर पुरातन वास्तू, स्मारके, मंदिरे बंद करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
देशात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून कोरोनाचा वेगाने फैलाव होईल, या शक्यतेने दिल्ली सरकारने ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी विशेष खबरदारी बाळगली आहे. ताजमहाल अनिश्चित काळासाठी पर्यटकांकरिता बंद राहणार आहे, तर लाल किल्ला, कुतुबमिनार या प्रेक्षणीय स्थळांवर सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी असणार आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या आवारात फोटोग्राफी, सार्वजनिक कार्यक्रम करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने परदेशी पर्यटकांवर काटेकोरपणे प्रवेशबंदी लागू केली आहे, असे केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.
देशभरात 137 जण कोरोनाग्रस्त
देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी 137 वर गेली. या रुग्णांमध्ये 22 परदेशी नागरिक आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5700 हून अधिक लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाचे 13 रुग्ण बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले



























































