
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप खासदार सुरेश प्रभू यांनी स्वत:हून विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. पुढचे 14 दिवस ते स्वत:च्या घरामध्ये इतरांपासून विलग होणार आहेत. प्रभू यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही मात्र तरीही त्यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रभू हे नुकतेच सौदी अरेबियावरून परत आले आहेत. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये या उद्देशाने त्यांनी लागण झालेली नसतानाही खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे.
BJP MP Suresh Prabhu has kept himself under isolation at his residence for the next 14 days, as a precautionary measure even after testing negative, following his return from a recent visit to Saudi Arabia to attend Second Sherpas’ Meeting on 10th March 2020. (file pic) #COVID19 pic.twitter.com/jz4YYX6ecf
— ANI (@ANI) March 18, 2020
कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाची 14 हजार लोकांना लागण झाली. त्यामुळे जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख 75 हजार 536 वर पोहोचली आहे. याचवेळी जगभरातील बळींचा आकडा सात हजारांवर गेला आहे.
चीनमधून डोके वर काढलेल्या कोरोना विषाणूने एक-एक करीत जगभरात हातपाय पसरले आहेत. हिंदुस्थानसह 130 हून अधिक देश या विषाणूच्या फैलावामुळे काळजीत सापडले आहेत. या सर्व देशांतील कोरोनाग्रस्त व बळींची संख्या मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केली. त्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे 13,903 नवीन रुग्ण आढळले, तर बळींच्या संख्येत 862 ने वाढ झाली.
अफगाणिस्तान, फिलीपाइन्स, मलेशियातून येणाऱया प्रवाशांना ‘नो एण्ट्री’
केंद्र सरकारने अफगाणिस्तान, फिलीपाइन्स आणि मलेशियातून येणाऱया प्रवाशांना देशात प्रवेशबंदी लागू केली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रवेशबंदी 31 मार्चपर्यंत लागू राहील, अशी माहिती मंगळवारी ‘ऑडिशनल ट्रव्हल ऍडव्हायजरी’तर्फे देण्यात आली. सरकारने या तीन देशांव्यतिरिक्त युरोपिय संघ, तुर्की आणि लंडनमधून येणाऱया प्रवाशांनाही हिंदुस्थानात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
कोरोनाचा उत्पन्नावर फटका वैमानिक शुल्कात सहा महिने सूट द्या, परदेशी विमान कंपन्यांचे सरकारला साकडे
कोरोना विषाणूच्या फैलावाचा विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. हिंदुस्थानबरोबरच परदेशी विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर परदेशी विमान कंपन्यांनी वैमानिक शुल्कात सहा महिने सूट देण्याची मागणी करीत तसे साकडे सरकारला घातले आहे. बोर्ड ऑफ एअरलाइन्स रिप्रेझेंटेटिव्ह इन इंडिया (बीएएलआर) या परदेशी विमान कंपन्यांच्या संघटनेने ही मागणी केली आहे. बीएएलआर ही 36 विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. याआधी सोमवारी एअर इंडिया पायलट युनियननेही आर्थिक मदतीसाठी सरकारला विनंती केली होती. विमान वाहतुकीवरील निर्बंध, विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय याचा विमान कंपन्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे, असे एअर इंडिया पायलट युनियन आणि बीएएलआरने सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.























































