
बार्शी तालुक्यातील मालवंडी हे गाव लिंबाच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी कांदा, टोमॅटो, लिंब ही पिक घेतात. यावेळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आल्यामुळे येथील शेतकरी अडचणीत आला आहे. तोडणीला आलेली लिंब व इतर पिके शेतातच फेकून द्यावी लागत आहेत. कोरोना विषाणूचा आर्थिक फटका येथील शेतकऱ्यांना बसलेला आहे .
कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी शासनाने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतकरी हवालदील झाले आहेत. लिंबू हे पीक बारमाही असते. मात्र त्याला उन्हाळ्याचे चार महिने मोठ्या प्रमाणात मागणी असते. भर उन्हाळ्यात कोरोना विषाणूमुळे मागणी कमी झाल्याचा फटका येथील पिकाला बसलेला आहे. त्यातच मागील दोन आठवडे मागणी कमी होती. आता बाजार समिती बंद असल्यामुळे ऐन बहरात आलेले पीक तोडून व फेकून द्यावे लागत आहे.
साई सरबती, फुले सरबत्ती, बालाजी अशा विविध जातीच्या लिंबाची रोपे या भागात लावलेली आहेत. यांना फळेही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. गेल्या वर्षी 500 लिंबाच्या एका गोणीला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला होता. यावेळी केवळ 150 ते 250 रुपये भाव एका गोणीला मिळत आहे. त्यामध्ये 50 रुपये टेम्पो भाडे वगळता शेतकऱ्यांच्या हाती 500 लिंबांना फक्त 100 ते 200 रुपये येतात. केवळ मालवंडी व परिसरातून 2200 ते 2500 गोणी रोज पुणे मार्केट येथे पाठविल्या जातात. बाजार बंद असल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे अशी माहिती लिंब बागायतदार राजेंद्र गुरव यांनी दिली.
चार वर्षांपासून वाढवलेल्या उभ्या झाडांवरील लिंबाला भाव मिळत नाही. जर कोरोना संसर्ग लवकर थांबला नाही व बाजार समिती वेळेत सुरू झाली नाही तर आमची परिस्थितीत अवघड होईल. आता लिंब रस्त्यावर फेकून द्यावी लागत आहेत जर परिस्थिती अशीच राहिली तर लिंबाबरोबर आता शेतकरीही रस्त्यावर येईल, अशी व्यथा येथील शेतकरी त्र्यंबक कदम, मनोहर उकरंडे, संजय गुरव, संतोष सलगर,भारत निमगावकर यांनी व्यक्त केली.


























































