
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद राहणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्व फळे, भाजीपाला दुकाने 14 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड नगर परिषद क्षेत्राच्या सीमा 14 एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मंगळवार मध्येरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची सूट देण्यात आली होती. मात्र, ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडईमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. तसेच सुरक्षित अंतराचे नियमही पाळले जात नव्हते. त्यामुळे वारंवार संचारबंदी आदेशाचा भंग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वेळोवेळी याबाबत नागरिकांना आवाहन तसेच कायदेशीर कारवाई करूनही लोकांच्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश फक्त मनपा नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असतील. त्याचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b)रोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.


























































