कुडाळमध्ये सॅनीटायझर गेट; कोरोना रोखण्यासाठी नगरपंचायतीचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत कुडाळ नगरपंचायतीने आणखी एक पाऊल उचलले आहे. शहरात गांधीचौक येथे मध्यवर्ती ठिकाणी कोरोना निर्जंतुकीकरण युनिट म्हणजेच सॅनिटायझर गेट उभारण्यात आले आहे. याठिकाणी कुडाळ शहरातील बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कपडे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहेत.

कुडाळ शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नगर पंचायत प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असून मच्छिमार्केट येथेही अशाप्रकारे सॅनिटायझर युनिट उभारले जाणार आहे. त्याचबरोबर शहरात गरज भासल्यास आणखी युनिट उभारण्यात येतील. शहरात नगर पंचायतीतर्फे 20 हजार मास्कचे वाटप सुरू असल्याचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले. कुडाळ शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी नगर पंचायतीतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, प्रभाग निर्जंतुकीकरणानंतर रोड पेंटींगद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यानंतर आता नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या पुढाकारातून मुख्याधिकारी नितीन गाढवे आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने गांधीचौक येथे सॅनिटायझर गेट उभारण्यात आला आहे. शनिवारी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.