
जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये राहाणारी सीआयएसएफ जवानांची पत्नी आणि उरण कोटनाका येथील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने उरण परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचेही वातावरण निर्माण झाले आहे.
कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेले दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये राहाणारी सीआयएसएफ जवानांची पत्नी आणि मुलगी या दोघी तीन दिवसांपूर्वी जेएनपीटीच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. संशयित म्हणून तपासणीसाठी दोघींनाही बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर आईचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर मुलीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.तर उरण शहराच्या वेशीवर असणाऱ्या कोटनाका येथील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा दोन दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला होता. या खासगी रुग्णालयाने संशयित रुग्णाला तपासणीसाठी नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तपासणीअंती इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे जेएनपीटी वसाहत आणि उरण शहरातील काही भाग सील करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. यामुळे जेएनपीटी बंदरातील कामगार आणि उरण परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.




























































