
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरातील राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन युद्धपातळीवर झटत असतानाच ‘सारी’चे नवे संकट महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांवरही ओढवले आहे. राज्यात 30 बळी घेऊन ‘सारी’ने धोक्याची घंटा वाजवली आहे. हे संकट आणखी वाढण्यापूर्वीच रोखावे लागेल. प्रसंग कसोटीचा असला तरी कोरोनामुळे सज्ज असलेली आरोग्य यंत्रणा सारीवरही नक्कीच मात करेल!
c ग्रामीण महाराष्ट्रात खास करून विदर्भ आणि मराठवाडय़ाला कोरोनासारखीच लक्षणे असलेला ‘सारी’ नावाचा आजार विळखा घालत आहे. ‘सिव्हीअरली ऍक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ असे लांबलचक नाव असलेल्या या आजाराची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. एक तर कोव्हीड-19 अर्थात कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. जीव धोक्यात घालून डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णालयातील कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यात ‘सारी’च्या आजाराने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी आणखी वाढवली आहे. श्वसनक्रियेत गंभीर स्वरुपाचा अडथळा निर्माण करणाऱया ‘सारी’च्या आजाराने गेल्या वीस दिवसांत महाराष्ट्रात 30 जणांचे बळी घेतले. राज्यात 550 हून अधिक लोकांना ‘सारी’ची लागण झाली. हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. विदर्भात तब्बल 350 तर मराठवाडय़ात 200 हून अधिक ‘सारी’चे रुग्ण आढळले आहेत. विदर्भात नागपूरच्या सरकारी रुग्णालयांत 12 जण ‘सारी’मुळे दगावले. अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिह्यांतही प्रत्येक एक असे 3 जण मृत्यूमुखी पडले. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार गडचिरोली व चंद्रपूर जिह्यात ‘सारी’ची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. पश्चिम विदर्भात देखील ही संख्या झपाटय़ाने वाढते आहे. संभाजीनगर आणि आसपासचा परिसर हा तर
कोरोनापेक्षाही ‘सारी’चाच हॉटस्पॉट
ठरला आहे. संभाजीनगरात ‘सारी’मुळे 14 जणांचा मृत्यू झाला. एकटय़ा संभाजीनगरातच खासगी व सरकारी रुग्णालयातील रुग्णांची संख्या 200 झाली आहे. मराठवाडय़ाच्या अन्य जिह्यांतही ‘सारी’चे लक्षणे असणाऱया रुग्णांची स्वतंत्र नोंद व यादी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मराठवाडय़ातील ‘सारी’ची रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे एकूणच जगभरात एक नकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असताना ‘सारी’च्या साथीचा शिरकाव झाल्याने नवे आव्हान उभे ठाकले आहे. एका अर्थाने आरोग्य यंत्रणेच्या कसोटीचाच हा काळ आहे असे म्हणावे लागेल. मात्र सुदैवाने कोरोनाच्या निमित्ताने गावखेडय़ांपासून महानगरांपर्यंत संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था डोळ्यात तेल घालून सज्ज असल्यामुळे कोरोनाच्या संशयीत रुग्णांप्रमाणेच ‘सारी’च्याही प्रत्येक रुग्णाची तेवढीच काळजी घेतली जात आहे. कोरोना आणि ‘सारी’ या दोन्ही रोगांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. ताप, सर्दी, खोकला, न्यूमोनिया आणि श्वास घेण्यासाठी होणारा त्रास किंवा धाप लागणे ही
एकसारखी लक्षणे
आढळत असल्यामुळे ‘सारी’च्या रुग्णांची कोरोना चाचणीदेखील केली जात आहे. या आजाराचे काही रुग्ण कोरोनाबाधित असल्याचेही आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा अत्यंत सावधगिरीने पावले टाकत आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात संभाजीनगरला लागून असलेल्या नगर जिह्यात आणि पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्येही ‘सारी’चा रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा संसर्ग हा केवळ साथीच्या स्वरुपाचा आहे तर ‘सारी’चा आजार हा बॅक्टेरिया आणि संसर्ग अशा दोन्हीतून होत असल्यामुळे ‘सारी’ची रुग्णसंख्या वाढण्याचा धोका अधिक आहे. ‘सारी’चे हे संकट केवळ महाराष्ट्रावर कोसळले असे नाही तर देशाच्या अन्य भागातही ‘सारी’ने आपले पाय पसरले आहेत. महाराष्ट्रासह देशातील 20 राज्यांच्या 52 जिह्यांमध्ये ‘सारी’ने शिरकाव केला आहे. देशभरात ‘सारी’ची रुग्णसंख्या 6 हजारच्या घरात आहे. ‘सारी’चे सर्वाधिक 792 रुग्ण गुजरातमध्ये तर तामीळनाडूत 577 रुग्ण आहेत. कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठी देशभरातील राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन युद्धपातळीवर झटत असतानाच ‘सारी’चे नवे संकट महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांवरही ओढवले आहे. राज्यात 30 बळी घेऊन ‘सारी’ने धोक्याची घंटा वाजवली आहे. हे संकट आणखी वाढण्यापूर्वीच रोखावे लागेल. प्रसंग कसोटीचा असला तरी कोरोनामुळे सज्ज असलेली आरोग्य यंत्रणा सारीवरही नक्कीच मात करेल!




























































