अनुभवी अमनप्रीत सिंह, मनू भाकेर व मेघना सज्जनर या हिंदुस्थानी खेळाडूंनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदकांची कमाई केली. करोनामुळे घरात अडकलेल्या नेमबाजांसाठी झुम ऍपवरील ही ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पर्वणीच ठरली. या स्पर्धेत 7 देशांतील 50हुन अधिक नेमबाजांनी सहभाग घेतला होता. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात अमनप्रीतने 576 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. आशीष डबास 575 गुणांसह उपविजेता ठरला, तर मनू भाकेर 572 गुणांसह तिसऱया स्थानी राहिली. हंगेरीची वेरोनिका मेजर 569 गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऑस्ट्रीयाच्या मार्टिन स्टेम्पफ्लेने 632.5 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. मेघना 630.5 गुणांसह दुसऱया, तर फ्रान्सचा एटियन जर्मोंड 629.4 गुणांसह तिसऱया स्थानी राहिला. जागतिक कर्मवारित अव्वल स्थानी असलेल्या दिव्यांश सिंह पंवारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता युवा नेमबाज मनू भाकेरसह अनेक नेमबाजांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. माजी हिंदुस्थानी नेमबाज शिमॉन शरीफ यांच्या संकल्पनेतून आलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी भाग घेतला होता. करोनामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने वर्षभरातील सर्वच स्पर्धा रद्द केल्या आहेत. मात्र विश्वचषक सुवर्णपदकविजेती मनू याबाबत अनभिज्ञ होती. परंतु ते माहीत झाल्यावर ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेबाबत तिने उत्साहाने भाग घेतला.

























































