कोरोनाच्या कारणाने रुग्णालयांनी प्रवेश नाकारला; हृदयविकाराचा झटका आलेल्या वकिलाचा उपचाराविना मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे एका 57 वर्षांच्या वकिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार वाशीमध्ये घडला आहे. या वकिलाला प्रथम नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कोरोनाचे कारण सांगून रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दुसऱ्या रुग्णालयात नेले असता तेथेही तेच उत्तर मिळाले. त्यानंतर त्यांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

वाशी येथील सेक्टर 17 मधील मोहन ब्रिजमध्ये राहणारे जयदीप जयवंत यांनी नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर ते आराम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा प्रकार त्यांची पत्नी आणि मुलाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जयदीप यांना तातडीने नजीकच्या एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र, तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना वाशी येथील महापालिका रुग्णालयात आणले असता तिथेही त्यांना तेच उत्तर मिळाले. हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराला विलंब झाल्यामुळे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जयदीप हे पेशाने वकील होते.