
नगर शहरातील एका प्रतिष्ठित कापड व्यावसायिकाने सर्व नियम झुगारून एका लग्नाचा बस्ता आपल्या दुकानात बांधायला सुरु केला. मात्र या प्रकारची खबर प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना समजताच त्यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेत हा बस्ता बांधणाऱ्या कापड व्यावसायिकाला व इतर 17 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने व्यापारी वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, काल सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेतील आंनद मारुतराव फासे यांच्या मालकीच्या श्रीराम कलेक्शन या दुकानात एका लग्नाचा बस्ता चालू असल्याची माहिती प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना समजली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना घेत या कापड दुकानावर छापा टाकला. तेव्हा त्यांना दुकानात आनंद फासे व त्यांचे दोन कर्मचारी, लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेले नवरा व नवरी, मुलीचे पंधरा नातेवाईक लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी करत असल्याचे आढळून आले.
या सर्वांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्यांच्या विरोधात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा पोलीस कॉन्स्टेबल ४३जे बी बांगर यांनी दाखल केला. रात्री उशिरा या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.


























































