
पालिकेच्या कोरोनाविरोधातील लढ्यात सुरक्षा विभागही आघाडीवर असून तब्बल दीड हजार कर्मचारी २४ तास ऑनड्युटी राहून कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे अत्यावश्यक सेवांमधील अनेक शासकीय-निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये पाच-दहा टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत काम केले जात असताना सुरक्षा कर्मचारी मात्र २४ तास ड्युटी करीत आहेत.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सुरक्षा विभागाची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयासह रुग्णालये, वॉर्ड ऑफिस आणि इतर कार्यालयांमध्ये येणार्या नागरिकांवर आणि अधिकारी-कर्मचार्यांची गेटवरच चौकशी-प्राथमिक तपासणी करणे, कोरोना आजाराच्या लक्षणांबांबत विचारणा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महिला कर्मचार्यांची संख्याही मोठी आहे. महिला कर्मचारीही कोणतीही सवलत न घेता आपले कर्तव्य बजावत आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयांवर उपचार सुरू असणारी हॉस्पिटल्स, क्वारेंटाइनच्या ठिकाणी काम करीत आहेत. मुंबईत सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी नाशिक, बदलापूरवरून मोटरसायकलने येणारेही असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांनी दिली.
रक्तदानामध्येही सहभाग
‘रक्त दान’ हे ‘श्रेष्ठ दान’ समजले जाते. त्यामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून शेकडो सुरक्षा कर्मचारी रक्तदानही करीत आहेत. रुग्णालयांमध्ये आलेले रुग्ण, संशयित यांना योग्य ठिकाणी पोहोचवणे, गर्दी टाळण्यासाठी ठराविक काळाने उद्घोषणा देणे, सुरक्षित अंतर पाळण्यासाठी नियोजन-कार्यवाही करणे अशी कामे करीत आहेत. सध्या एकूण २४०० पर्मनंट स्टाफसह कंत्राटी कर्मचारी पालिकेची सुरक्षा करीत आहेत.
सुरक्षेचे नियम पाळूनच काम
सुरक्षा कर्मचारी मोठ्या प्रमाणात कर्तव्यावर असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारीही घेतली जात आहे. सोशल डिस्टन्स पाळणे, वेळोवेळी हात धुणे, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, निर्जंतुकीकरण अशा सुविधा कर्मचारी अधिकार्यांना दिल्या जात आहेत.
अनेकांनी कित्येक दिवस घरही पाहिले नाही!
सुरक्षा विभागात काम करणार्या कर्मचारी अधिकार्यांना अनेक वेळा कोरोना हायरिस्क विभागात काम करावे लागते. या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जात असली तरी खबरदारी म्हणून अनेक जण कित्येक दिवस घरीही गेलेले नाहीत. भांडूप ट्रेनिंग सेंटर येथे अशा कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणीही सोशल डिस्टन्स पाळले जात असल्याचे पालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांनी सांगितले.


























































