स्वतःची अन गरीबांची काळजी घे, शिवसेना पक्षप्रमुखांच्या फोनने आमदार बांगर सदगदीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष, स्वतःसह हिंगोली जिल्ह्यातील गोरगरिबांची काळजी घे अशा आपुलकीच्या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर आस्थेवाईकपणे विचारना केल्यामुळे शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर सदगदित झाले. उद्धवसाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र सांभाळतांना प्रत्येकाची काळजी घेत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम  करण्याचे संधी मिळाल्याने आम्ही  भाग्यवान आहोत असे भावनिक मनोगत आमदार संतोष बांगर यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे शिवसेनेकडून हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मदत दिली जात आहे. तसेच कामानिमित्त पुणे, मुंबई, संभाजीनगर या मोठ्या शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना देखील तेथील सहकाऱ्यांचा मदतीने मदत पोहोंचवली  जात आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यात कुठे गोरगरिबांना, नागरिकांना काही अडचणी आहेत का ? कूठे मदतीची गरज आहे का ? याचा आढावा सहकार्‍यांसोबत घेत असताना अचानक शिवसेना आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या भ्रमणध्वनीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी मतदारसंघातील कोरोणाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली.  तसेच स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरिबांना वाटप झालेले धान्य याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली.  फोनवरील संभाषणाच्या सुरुवातीलाच संतोष, काय वातावरण आहे तुमच्याकडे ? हिंगोलीची काय परिस्थिती आहे ? स्वतः सह गोरगरिबांची काळजी घे अशी आपुलकीची विचारणा व प्रेमाचा आदेश उद्धव साहेबांनी आपल्याला देऊन त्यानंतर माहिती घेतल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. तसेच नेहमीप्रमाणे गर्दी जाणे टाळावे, गर्दी होऊ देऊ नये, गाफील अजिबात राहु नका, गोरगरिबांकडे लक्ष ठेवा, गोरगरिबांना आधार द्या अशा सूचनाही उध्दव ठाकरे यांनी केल्याचेही बांगर म्हणाले.  यापूर्वी पक्षाच्या कामानिमित्त व  वैयक्तिक अडचणीच्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो. तसेच बऱ्याच वेळेला फोनवर देखील बोलणे झाले. मात्र, आज उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःहून माझ्यासारख्या शिवसैनिकाची व गोरगरीबांची आपुलकीने केलेली विचारपूस आजन्म स्मरणात राहील. संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिस्थितीशी मुकाबला करत राज्याला धीर देत आहेत. उद्धव साहेबांच्या रूपाने महाराष्ट्र एका देव माणसाच्या हाती असुन कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितच जिंकु असा विश्वासही आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी व्यक्त केला.