हिंगोलीत एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा, 4 रुग्णांना संभाजीनगरला हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोलीमध्ये आज शुक्रवारी म्हणजेच 1 मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज एकाच दिवसात हिंगोलीत 26 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, 4 कोरोना रुग्णांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले आहे.

मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्तावरून 19 व 20 एप्रिल रोजी हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी जिल्ह्यात परत आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 25 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित झाले असून सायंकाळी आणखी एका जवान कोरोनाग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची संख्या 47 इतकी झाली असून एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या 47 रुग्णात 42 जण एसआरपी जवान आहेत. तर हिंगोलीच्या चार रुग्णांना संभाजीनगरच्या येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.