लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 2 मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 91,217 गुन्हे दाखल झाले असून 18,048 व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 25 लाख (3 कोटी 25 लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला.अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 82,984 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. व 51,719 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 173 घटनांची नोंद झाली असून यात 659 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 51 पोलीस अधिकारी व 310 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.