
कोरोनाच्या फैलावामुळे देशात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विद्यापीठांद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांवरही परीणाम झाला आहे. याबाबत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने तोडगा काढला आहे. या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाची शुक्रवारी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहेत आणि ज्यांची अंतिम परीक्षा शिल्लक राहिली आहे, अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
‘अंतिम सत्राच्या परीक्षा तातडीने रद्द करणं हे UGC च्या सूचनावलीत नसल्याने त्या रद्द केल्या जाऊ शकत नाही. कदाचित त्या 3 तासांच्या परीक्षा 2 तासाच्या केल्या जाऊ शकतील. 100 मार्कांऐवजी 50 मार्कांचे पेपर घेऊन त्याला गुणिले 2 करून मार्क दिले जातील असे मार्ग अवलंबले जातील.’ असे सामंत यांनी सांगितले. लॉकडाऊन असाच कायम राहिला, कोरोनाचा प्रभाव कायम राहिला तर मग अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असे ते म्हणाले . ‘8 दिवसांपूर्वी UGCची जी सूचनावली प्राप्त झाली आहे त्यामध्ये सगळ्या राज्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्हाला अंतिम सत्राच्या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत लावणं अपेक्षित आहे कारण पुढील शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू करायचे आहे’ अशी माहितीही सामंत यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा नाही अशा विद्यार्थ्यांना UGC च्या गाईडलान्सच्या आधारे मार्क देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्याची या वर्षातील कामगिरी आणि आधीच्या वर्षातील कामगिरी अशी दोन्ही विचारात घेऊन मार्क ठरवण्यात येतील. जे विद्यार्थी यात उत्तीर्ण होतील त्यांना पुढच्या वर्षासाठी प्रवेश दिला जाईल. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्षाला प्रवेश देण्यात येईल मात्र त्यांना पुढील वर्षी परीक्षा द्यावीच लागणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शनिवारी राज्यातल्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत माहिती दिली. ‘सध्या जे कोर्स सुरू आहेत, त्यामध्ये शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राचीच फक्त परीक्षा घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमांच्या, ज्या विषयांच्या शेवटच्या सत्रातील शेवटच्या परीक्षा बाकी आहे त्या युजीसीच्या सूचनेनुसार 1 ते 30 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षा घेत असताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच त्या घेतल्या जातील असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी UGC च्या सूचनेनुसार ग्रेडींग व्यवस्थेचा वापर करणार
कॉलेज आणि सीईटीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विस्ताराने चर्चा केली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ओढावलेल्या संकटामुळे फक्त पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फक्त अंतिम सत्राचीच परीक्षा घ्यावी असं सर्वानुमते ठरवण्यात आले. जे विद्यार्थी अंतिम सत्राची परीक्षा देणारे नसतील त्यांची परीक्षा न घेता आधीच्या मार्कांच्या आधारावर पुढच्या वर्गात पाठवावे असेही या सल्लामसलतीमध्ये ठरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मार्कांबाबत निर्णय घेत असताना त्या विद्यार्थ्याची गेल्या वर्षातील 50टक्के कामगिरी आणि यंदाच्या वर्षाची 50 टक्के कामगिरी लक्षात घेऊन त्याला गुण दिले जाणार आहेत. युजीसीच्या सुचनांनुसार विद्यार्थ्यांना ग्रेड सिस्टीमने मार्क देण्यात येणार आहेत. यावेत नुसार मार्क द्यावेत अशी भूमिका आम्ही घेतली आहे’, असं उदय सामंत यांनी जाहीर केलं.
लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढला, परिस्थिती अशीच राहिली तर 20 ते 25 जूनदरम्यान पुन्हा एकदा परीक्षांसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे UGC ने सांगितले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा या घ्याव्याच लागतील कारण त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्यात 8 ते 9 लाख इतकी आहे.
JEE च्या परीक्षा 18 ते 23 जुलैच्या दरम्यान घ्यायचं केंद्र शासनाने ठरवलं आहे. 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 1 ते 15 जुलैदरम्यान UG च्या CET परीक्षा आणि 23ते 30 जुलैमध्ये पीजीच्या परीक्षा असं नियोजन करण्यात आलं आहे. ही परीक्षा तालुकास्तरावर कशा घेता येतील यासाठीचा आराखडा तयार केला जात आहे.
लॉकडाऊनला 8 मे रोजी 45 दिवस झाले आहे. हे 45 दिवस विद्यार्थी महाविद्यालयात हजर होते असं ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे दिवस धरूनही ज्या विद्यार्थ्यांची हजेरी पूर्ण होत नाही अशा विद्यार्थ्यांबाबतही विद्यापीठाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा सूचना देण्यात आल्या आहेत.
JEE च्या परीक्षा 18 ते 23 जुलैच्या दरम्यान घ्यायचं केंद्र शासनाने ठरवलं आहे. 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 1 ते 15 जुलैदरम्यान UG च्या CET परीक्षा आणि 23ते 30 जुलैमध्ये पीजीच्या परीक्षा असं नियोजन करण्यात आलं आहे. ही परीक्षा तालुकास्तरावर कशा घेता येतील यासाठीचा आराखडा तयार केला जात आहे.
लॉकडाऊनला 8 मे रोजी 45 दिवस झाले आहे. हे 45 दिवस विद्यार्थी महाविद्यालयात हजर होते असं ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे दिवस धरूनही ज्या विद्यार्थ्यांची हजेरी पूर्ण होत नाही अशा विद्यार्थ्यांबाबतही विद्यापीठाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वायत्त विद्यापीठांनीही याच पद्धतीने परीक्षा घेतल्या पाहिजेत असे सामंत यांनी सांगितले.
























































