रत्नागिरीत आढळले कोरोनाचे पाच रुग्ण, लांजा तालुक्यातील दोन मुलांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये लांजा तालुक्यातील नऊ आणि दहा वर्षांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे. त्यापैकी 40 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.

सोमवारी सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही. आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटर मधील आहेत. तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील येथील रहिवासी आहे. याव्यतिरीक्त लांजा येथील 2 लहान मुलांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा रूग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याने ती रहात असलेला नर्सिंग सेंटर आणि खारेघाट परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू  

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दापोलीतील कोरोना बाधित 65 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हि महिला मुंबईतून आली होती. तिच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया झाली होती. 2 मे पासून तिच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु होते. यापूर्वी खेड येथील 50 वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा हा दुसरा बळी आहे.