
>> अभिषेक भटपल्लीवार
औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. मात्र, कोरोना संकटामुळं हे उद्योगविश्व आर्थिक अडचणीत सापडलं आहे. लॉकडाऊन कालावधीत या उद्योगांना सुमारे बाराशे कोटींचा फटका बसलाय. जिल्ह्यात खनिज विपुल प्रमाणात असल्यानं वीज प्रकल्प, सीमेंट कारखाने, कच्चा पोलादाचे प्रकल्प यासोबतच लघू आणि मध्यम प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. आजघडीला जिल्ह्यात चारशेवर लहानमोठे उद्योग आहेत. यातील केवळ दहा टक्के म्हणजे सुमारे 44 उद्योग सद्यस्थितीत सुरू आहेत. जे उद्योग आता सुरू आहेत, त्यात मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. या सुरू असलेल्या उद्योगातून उत्पादन मागील महिनाभरापासून सुरू झालं. मात्र ते खरेदी करणाऱ्या ग्राहक कंपन्याच बंद असल्यानं हा साठा पडून आहे. इथला सीमेंट, रंग, सिमेंटच्या बोरी, कच्चा पोलाद हे सगळं पडून आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेले हे उद्योग सुरू होऊनही माल पडून असल्यानं या उद्योगांची चिंता वाढली आहे.
औद्योगिक महामंडळ असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील उद्योगांची वार्षिक उलाढाल ही साडेआठ हजार कोटींची आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रकल्पांचा समावेश नाही, हे महत्त्वाचं. त्यांना जर यात समाविष्ट केलं, तर ही उलाढाल आणखी वाढू शकते. खासगी उद्योगांतून शासनाला मिळणारा जीएसटी वर्षाला सुमारे दीड हजार कोटींचा आहे. तर महिन्याला तो सुमारे दीडशे कोटी आहे. मार्चचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल अशा सवामहिन्यात शासनाचा पावणे दोनशे कोटींचा जीएसटी बुडाला. तर उद्योगांना या महिनाभरात अंदाजे बाराशे कोटींचं नुकसान सहन करावं लागलं. जिल्ह्यातील उद्योगांमधील सुमारे वीस टक्के कामगार काम सोडून गेले. त्यामुळं हाताशी असलेल्या कामगारांच्या भरवशावर इथले मूठभर उद्योग कसेतरी सुरू आहेत. उद्योगांवर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सरकारनं पॅकेज जाहीर करावं आणि जिल्ह्यात उत्पादित होणारा माल हा जिल्ह्यातीलच उद्योगांना घ्यायला भाग पाडणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
या जिल्ह्यात उत्पादित माल हा प्रामुख्यानं परराज्यात पाठवला जातो. पण तेथील प्रकल्पही बंद असल्यानं व वाहतुकीसाठी वाहनं उपलब्ध नसल्यानं इथल्या उद्योगांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळं सुरू असलेल्या 44 उद्योगांपैकी बहुतांशी उद्योग आपलं उत्पादन केव्हाही बंद करू शकतात, अशी बिकट स्थिती इथं निर्माण झालीय.

































































