
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून विविध देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण, उत्सवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. सध्या रमझानचा महिना सुरू असून महिन्याच्या शेवटी ईद-उल फित्र येत आहे. सौदी अरेबियामध्ये ईदपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसांच्या सुट्टीमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 23 ते 27 मे दरम्यान सौदी अरेबियात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
सौदी अरेबियामध्ये रमझानचा महिना सुरू असल्याने तिथल्या लोकांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळमर्यादा घालून देण्यात आली आहे. सौदी अरेबियात 23 ते 27 मे अशी पाच दिवसांची सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे. ANI या वृत्तसंस्थेने सौदी अरेबियातील वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटलंय ती कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हे रमझान संपेपर्यंत कायम राहणार आहेत.
ऐतिहासिक मक्का शहरामध्ये आधीपासूनच संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. एकट्या मक्केतून कोरोनाचे 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले होते. सौदी अरेबियातील कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या क्षेत्रांमध्ये मक्केचाही समावेश आहे. सौदी अरेबियातील सरकारने तिथल्या नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन केले आहे.
सौदी अरेबियात कोरोनाचे सोमवारी 1900 रुग्ण सापडले होते. तिथल्या मृतांचा आकडा हा 264 इतका झाला असून आतापर्यंत 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत तिथे कोरोनाचे 43 हजार रुग्ण सापडले आहेत.


























































