
बदनापूर तालुक्यातील कूसळी येथे शुक्रवारी दुपारी 4 ते 4.30 वाजता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने फटका दिला आहे. या वादळी पावसाने कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे शेड उडून जाऊन कोंबड्या मृत्यमुखी पडून सुमारे10 लाखांचे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या कहर सुरू असतानाच निसर्गाच्या प्रकोपाने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. बदनापूर तालुक्यातील विष्णू रामभाऊ काकडे हा अल्पभूधारक शेतकरी जोडउद्योग म्हणून कुक्कुटपालन करतो. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गट क्रमांक 253 मध्ये तीन शेडची उभारणी केली होती. या ठिकाणी ते शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करतात. तीन महिन्यांपासून त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत असून आधी कोंबडीपासून कोरोना होतो या अफवेने कोबंड्याची विक्री घटली होती. त्यानंतर मोठ्या उमेदीने त्यांनी अंबड येथून तीन महिन्यांपूर्वी दीड हजार गावरान व दीड हजार बॉयलर पक्षी आणून उत्पादन सुरू केले. या पक्ष्यांसाठी पत्र्याचे मोठे शेड उभारण्यात आले. या शेडमध्ये गावरान 1500 व बॉयलर 1500 असे एकूण 3 हजार पक्षी त्यांनी जगवले. या पक्ष्यांना दररोज जवळपास पाच क्विंटल खाद्य लागते. उबवणूक ते तीन महिने सांभाळ करण्यासाठी या शेतकऱ्याला जवळपास 10 लाख रुपये खर्च आला होता. आता पक्षी विक्रीजोगे झाले असतानाच शुक्रवारी आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण शेड उडून जाऊन नुकसान झाले आहे.


























































