परभणी- मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीत मुंबईहुन आलेल्या एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. याबाबतचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

परभणी शहरातील मिलिंद नगर येथे मुंबई येथील गोरेगाव येथून एक महिला कुटुंबासह 5 दिवसांपूर्वी परभणीत दाखल झाली होती. या महिलेला त्रास होत असल्याने 2 दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी नांदेडला पाठवला होता. त्यात त्या महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. सदरील महिलेला कोरोना झाल्याची माहिती मिळताच या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान, या महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परभणीत आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे. सध्या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एक जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला आहे.