कळंब – कोरोना रुग्ण वाढले; रस्ते सील, दूध संकलनही बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपचाराच्या कुठल्याही सुविधा नाहीत अशा परिस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील गावागावांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. पाथर्डी गावातून एक तर हावरगाव येथील दोघांना तर शहरातील एका कोरोनाची लागण झाली आहे. सुविधा नसताना धोका निर्माण होणे ही गोष्ट महामारीसाठी सर्वाधिक धोक्याची मानली जाते त्यामुळे तालुक्यात पुणे-मुंबई हॉटस्पॉट एरिया मधून जवळपास 2542 लोक आले आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद झाला आहे.

मुंबई पुण्याच्या हॉटस्पॉट भागातून लोंढेच्या लोंढे ग्रामीण भागात येते आहेत. हावरगाव येथील दोन महिला मुंबई येथुन आल्या त्या पॉझिटिव्ह निघाल्या यामुळे हावरगाव येथील सर्व रस्ते सील करण्यात आले असून गाव बंद करत दूध संकलनही बंद केल्याची माहिती उपसरपंच चक्रधर कोल्हे यांनी दिली.

कळंब येथील आरोग्य उपकेंद्रात वीस बेडचे कोविड हॉस्पिटल असून या ठिकाणी व्हेंटेलेटरची सुविधा नाही अशी माहिती वैद्यकिय अधिकारी जीवन वायदंडे यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी विद्यानीकेतन विद्यालय येरमाळा पन्नास बेड शहरातील आंबेडकर वस्तीगृह पन्नास बेडचे कोविड हॉस्पिटल निर्माण केले असून तालुक्याचा कारभार सोळा वैद्यकीय अधिकारी, तेवीस समुदाय डॉक्टर, तर 38 सिस्टरवर असून वैद्यकीय यंत्रणेचा गाडा हाकला जातोय.

बाहेरून येणारे लोक धोकादायक ठरत असून वैद्यकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. नॉन कोविडसाठी शहरातील तीन खासगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन या ठिकाणी 56 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

हॉटस्पॉट मुंबई, पुणे, संभाजीनगर येथून ग्रामीण भागात झुंडीच्या झुंडी छुप्या मार्गाने येत आहेत. शासकीय दप्तरी 2542 लोकांची नोंद असली तरी प्रत्यक्षात छुप्या मार्गाने पाच ते सात हजार लोक आल्याचा अंदाज आहे. या हायरिस्क हॉटस्पॉट भागातून लोक येत असल्याने ग्रामीण भागात धोका वाढतच चालला आहे. प्रशासनाच्या लक्षात आल्याने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून बाहेरून येणाऱ्यांनी स्वतःहून तपासणी करून घ्याव्यात असे आवाहन केले आहे.