
इमारतीमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने, आगीत अडकलेल्या 9 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मात्र, आगीत दोन फ्लॅट जळाले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
माझगावमधील सेंट मेरी रोडवर ‘सिरीन मंझील’ ही सात मजली इमारत आहे. सोमवारी दुपारी 12.30 वाजता सहाव्या मजल्यावरील एका घराला अचानकपणे आग लागली. वाऱ्यामुळे ही आग अधिक पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाचव्या मजल्यावर अडकलेल्या दोघांची तर सातव्या मजल्यावर अडकलेल्या सात जणांची अशा एकूण 9 जणांची सुखरूप सुटका केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार फायर इंजिन, चार वॉटर टँकर यांच्या साहाय्याने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवली. दरम्यान, या आगीच्या कारणांची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.


























































