
परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील साखला प्लॉट भागात एका व्यक्तीचा आज मंगळवार, 19 मे रोजी प्राप्त झालेल्या स्वॅब अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
परभणीत आणखी एक रुग्ण आज सकाळी वाढल्याने प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांना देखील टेन्शन आले आहे.
कोरोना विषाणु संदर्भात मंगळवार, 19 मे रोजी सकाळी अहवाल प्राप्त झाला असून त्यात परभणी शहरातील साखला प्लॉट परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे साखल प्लॉट व लगतचा परिसर 19 मे रोजीच्या सकाळी 7.00 पासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. याशिवाय संचारबंदी लागू केलेल्या भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल असेही आदेशात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषयक सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आल्यास संबधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. तरी जिल्हावासियांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व न घाबरता कुठल्याही अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
कोरोना बाधित युवक पुण्याचा
परभणीतील साखला प्लॉट भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला हा युवक पुण्यातील फातेमानगर भागातून 17 मे रोजी परभणीत परतला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी तो युवक दाखल झाला होता. त्याचा स्वाईब नांदेड येथे पाठविण्यात आला होता. आज सकाळी त्याचा रिपोर्ट आला आणि तो युवक पॉझिटिव्ह आढळला.
दरम्यान, प्रशासनाने सदरील युवक राहत असलेला साखला प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी साखला प्लॉट परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
परभणीत आत्तापर्यंत 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला आहे. तर 6 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































