
जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार येथील सरोवराचे पाणी लाल झाले असून अल्कधर्मी पाण्यात आम्ल गुणधर्म आल्याने पाणी लाल झाले असे मत लोणार सरोवर वर अभ्यास करणारे प्रा.सुधाकर बुगदाणे यांनी व्यक्त केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातील लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्यापाण्याचे सरोवर आहे. पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाता मुळे हे सरोवर निर्माण झाल्याचा शास्त्रज्ञाचा दावा आहे. या सरोवराचे पाणी खारे आहे. जगातील शास्त्रज्ञ,पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. दोन दिवसांपासून सरोवराचे पाणी लाल दिसत आहे. लोणार येथील विज्ञान शिक्षक प्रा.सुधाकर बुगदाणे हे सरोवराच्या जतनासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच सरोवराच्या पाण्याच्या बदलाबाबत अभ्यास सुद्धा करतात. सध्या सरोवराचे पाणी लाल झाले याविषयी आज त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता ते म्हणाले की सरोवरातील पाणी साधे पाणी नाही. ते रासायनिक द्रव्य आहे. या पाण्यात क्षारयुक्त पदार्थ असल्याने ते खारे आहे. काही वर्षापर्यंत हे प्रमाण १४.५% होते. मात्र प्रदुषणामुळे सध्या ते ९.५% आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सरोवराचे पाणी कमी होते. व रंग फिकट पिवळा होतो. मात्र वाढत्या प्रदुषणामुळे सरोवरातील अल्कधर्मी पाण्यात आम्ल गुणधर्म आल्याने पाणी लाल झाल्याचे मत त्यांनी सांगितले.
‘या सरोवरात जे अल्कलाईन जिवाश्म आहेत ते समुद्रात सुद्धा आहेत. मात्र सरोवरातील हे जिवाश्म नष्ट झाले तर नैसर्गिक चक्रावर याचा परिणाम होईल. तसेच सरोवराचे पाणी अल्कलाईन राहणार नाही. व ज्या गुणधर्मा साठी जगात सरोवराची ओळख आहे ती भविष्यात राहणार नाही अशी भीती सुध्दा त्यांनी व्यक्त केली. सरोवराच्या जतनासाठी आपली न्यायालयात याचिका दाखल असून जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सरोवर जतन व परिसर विकास साठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या सरोवराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी या पाण्याचे नमुने व शैवाल तपासणीसाठी पाठवावे असेही मत त्यांनी व्यक्त केले.


























































