हरिनाम गजराला कोरोनाची बाधा; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मंदिर भागात दुकाने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र आळंदीतून श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका सोहळ्याचे प्रस्थान उद्या शनिवारी (दि. 13) दुपारी चारच्या सुमारास होणार आहे. अवघी अलंकापुरी ‘श्रीं’चे प्रस्थान सोहळ्यास सज्ज असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रस्थानदिनी मंदिरात केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा हरिनाम गजरात होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. मंदिरप्रदक्षिणेनंतर 30 जूनपर्यंत पादुकांचा मुक्काम दर्शन मंडपातच असेल.

पादुका प्रस्थान सोहळादिनी मंदिर परिसरातील 100 मीटर भागातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषद प्रशासनाने व्यापाऱयांना दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5मध्ये कुऱहाडे आळीमध्ये एका कोरोनाबाधित महिलेचे नुकतेच निधन झाल्याने खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरालगतचा काही परिसर प्रतिबंधित व काही परिसर ‘बफर झोन’ घोषित केला आहे. प्रस्थानदिनी दुकाने उघडू नयेत, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.

आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने भाविक, बाहेरील नागरिकांना निवासासाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येऊ नये, अशा नोटिसा पंढरपूरप्रमाणे आळंदीतील सर्व धर्मशाळा, मठ, लॉजचालक, व्यवस्थापक यांना बजाविण्यात आल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्याचा इशारा भूमकर यांनी दिला.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार 50 लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. इतरांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, समीर भूमकर यांनी केले आहे.

या वर्षी प्रस्थान सोहळ्यास लाखो भाविकांच्या गर्दीत हरिनामाचा गजर होणार नसल्याने इंद्रायणी नदीघाट परिसर मोकळा असून, नेहमी गर्दीने फुललेले रस्ते व नदीकिनारा या वर्षी गर्दीमुक्त आहे. आळंदीनगरी प्रस्थान सोहळ्यास सज्ज झाली आहे. माउली मंदिरातही प्रस्थान सोहळ्याच्या तयारीची लगबग अंतिम टप्प्यात असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

असा आहे दिनक्रम

आळंदी मंदिरात पहाटे घंटानाद, काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, आरती आणि सकाळी नऊ वाजता वीणामंडपात कीर्तन होईल. दुपारी ‘श्रीं’च्या गाभाऱयाची स्वच्छता करण्यात येईल. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’च्या पादुका सोहळा प्रस्थानाला सुरुवात होईल. श्री गुरू हैबतरावबाबा यांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती होईल. आळंदी देवस्थानतर्फे आरती, प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसादवाटप करण्यात येईल. माउलींच्या पादुका वीणामंडपात येतील. संस्थानतर्फे मानकऱयांना पागोटेवाटप, श्री गुरू हैबतरावबाबा यांच्या प्रतिनिधींकडून प्रमुख मानकरी, प्रतिष्ठत व दिंडीप्रमुख यांना प्रसादवाटप होईल. त्यानंतर माउलींच्या पादुकांचे हरिनामाच्या गजरात वीणामंडपातून प्रस्थान होणार आहे. मंदीरप्रदक्षिणा होऊन ‘श्रीं’च्या पादुकांचे दर्शनमंडपात आगमन व समाजआरती होऊन सोहळा 30 जूनपर्यंत विसावणार आहे. परंपरेचे कार्यक्रम आजोळघरी दर्शनबारी सभागृहामध्ये होणार आहेत.

‘श्रीं’चे अश्व शितोळे सरकार यांच्या राजवाडय़ातच विसावले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी अंकली ते आळंदी असा हरिनामाच्या गजरात प्रवास करीत येणारे श्रीं ज्ञानेश्वर माउलींचे अश्व या वर्षी मात्र आळंदीत शुक्रवारी (दि. 12) प्रस्थान सोहळ्यास प्रवेशले नाहीत. परंपरेने अश्वांचे प्रस्थान झाले. मात्र, आळंदीकडे पाच पावले प्रस्थान झाल्यानंतर अश्व अंकलीमधील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या राजवाडय़ातच विसावले.