मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे बहुउपयोगी अ‍ॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आणि तुम्ही जर संकटात असाल तर पालिकेच्या अ‍ॅपमुळे एका क्लिकवर तुम्ही पालिकेच्या आपत्कालीन विभागासह तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आपल्या लोकेशनसह संदेश देऊ शकणार आहात. यासाठी पालिकेने ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ अ‍ॅपवर ‘एसओएस’ ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा सुरू केली आहे. यामुळे संकटकाळात तातडीने मदत मिळण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवली असताना आता संकटकाळात वेगाने मदत मिळण्यासाठी सुविधा निर्माण करून दिली आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे. या उपक्रमात ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपवर पालिका क्षेत्रातील पावसाळी परिस्थितीची माहिती, भौगोलिक स्थितीची माहिती, आणिबाणीप्रसंगी कुठे संपर्क साधावा याची माहिती असेल.

अ‍ॅपवर अशा सुविधा मिळणार

– मोबाईल अ‍ॅपवरील ‘एसओएस’ या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेवर आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांचे मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करू शकणार आहात.  दुर्दैवाने पावसाळ्यात कुठल्याही संकटात अडकल्यास ‘एसओएस’ सुविधेवर क्लिक केल्यास तुम्ही सेव्ह केलेल्या सर्व मोबाईल क्रमांकारवर लोकेशनसह एसएमएस जाणार आहे.

– या शिवाय मोबाईल अ‍ॅपवर ‘इमर्जन्सी’ या बटनावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणच्या 500 मीटर त्रिज्येच्या परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्रे, पोलीस ठाणी, पालिका विभाग, नियंत्रण कक्षाचे संपर्क दिसणार आहे.

– तसेच ‘सेफ्टी टिप्स’ या सुविधेअंतर्गत 20 वेगवेगळ्या आपत्तीप्रसंगी  काय करावे आणि काय करू नये याचीही माहिती देणार्‍या 20 अ‍ॅनिमेटे फिल्मही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

– विशेष म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी पडलेल्या पावसाचे प्रमाण, भरती-ओहोटी-लाटांची उंची, पर्यायी वाहतूक व्यवस्था लोकल-विमान वाहतुकीची स्थिती याची माहितीही या मोबाईलवर पाहता येईल.