
लॉक डाऊनच्या काळात तीनशे लोकांनी आत्महत्या केल्या असल्या तरी किती हजार किंवा किती लाख लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेले असतील, याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. कुठे घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्न, तर कुठे घरभाडे कसे भरायचे ही चिंता. लाखो लोकांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे कोरोना न होताही लोक मृत्यूला कवटाळत आहेत. मानसिक ताणतणावाचे हे बळी रोखायचे कसे?
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी मराठीत एक म्हण आहे. कोरोनाच्या चौखूर उधळलेल्या संकटात जगणेच असह्य झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिवसागणिक या म्हणीचा प्रत्यय येतो आहे. असह्य झालेल्या तणावातून नैराश्याचा जन्म होतो आणि आत्महत्येच्या रूपाने माणसाचा मृत्यू. याला कोरोनाचे साईड इफेक्ट म्हणा किंवा काही, पण हाताला नसलेले काम आणि त्यातून उद्भवलेली आर्थिक चणचण यामुळे मोठेच मानसिक ताणतणाव निर्माण झाले. या तणावातून महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याचे दिसते. पुण्यातही तेच घडले. पुण्याच्या सुखसागरनगर भागात राहणाऱया एकाच कुटुंबातील चौघांनी बुधवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. सहा आणि तीन वर्षांच्या दोन्ही अपत्यांना गळफासाने मारून नंतर त्यांच्या आई-बाबांनीही आत्महत्या केली. आपल्याच चिल्ल्यापिल्ल्यांना गळफास देण्याची निष्ठुरता या दाम्पत्याकडे कशी आली असेल? मनच काय, वैरीही कधी असा विचार करणार नाही. पोलिसांनी जेव्हा दार तोडले तेव्हा घरात चौघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा शाळांचे ओळखपत्र बनविण्याचा व्यवसाय होता. परंतु लॉक डाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला आणि त्याने
आयुष्याची ओळखच
संपवली! अशा प्रकारची ही एकच घटना नाही. पुण्यातच धायरी भागातील एका मंडप व्यावसायिकानेही असाच गळफास लावून घेतला. लॉक डाऊनमुळे एक पैशाचाही धंदा होत नव्हता. समारंभ, उत्सव, लग्नसोहळे सगळेच बंद. आर्थिक संकट वाढले तसा त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. पुण्याजवळील वाकड येथेही एका दिवसात तीन आयटी अभियंत्यांनी स्वतःचे आयुष्य संपविले. नैराश्येपोटी त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले गेले. हे भयंकर आहे. कोरोना संसर्गामुळे देशात लॉक डाऊन झाल्यानंतर सर्वच राज्यांमध्ये आर्थिक संकट आणि नैराश्येमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांचे मृतदेह सापडले. केरळमध्ये एका 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने ऑनलाइन क्लासला हजेरी लावण्यासाठी कॉम्प्युटर, स्मार्ट फोन नसल्यामुळे आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील खांडवामधील एका व्यापाऱ्याने आपल्याच गोडाऊनमध्ये आयुष्याचा व्यवहार संपविला. उत्तर प्रदेशात भामौरा गावात चोवीस वर्षीय तरुणाने क्वारंटाईन असताना जीवनयात्रा संपविली. लॉक डाऊनच्या काळात भविष्याच्या चिंतेने गेल्या दोन-एक महिन्यात थोड्या थोडक्या नव्हे, तीनशेहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. यामध्ये गरीब, हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे देश लॉक डाऊन झाल्यानंतर सगळे
अर्थचक्रच ठप्प
झाले. भविष्यातील नफ्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांची आशा-आकांक्षा चक्काचूर झाली. गोरगरीब आणि मध्यमवर्गीय आर्थिक चणचणीच्या दुष्टचक्रात सापडले. गरीबावर तर मिळेल ते खाऊन जगण्याची वेळ आली. लॉक डाऊनचे हे संकट महिनाभरात दूर होईल म्हणता म्हणता तीन महिन्यांवर लांबले. त्यामुळे आधीच निराश झालेले लोक आणखी खच्ची झाले. आता जरी अनलॉक होऊन अर्थचक्राला चालना मिळत असली तरी अनेक व्यावसायिक क्षेत्रे अद्याप ठप्पच आहेत. आणखी सहा महिने तरी व्यवसायात धुगधुगी येईल की नाही, याची कोणालाच शाश्वती नाही. कारखानदार, व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या करोडो लोकांना ‘उद्या’ची चिंता सतावत आहे. आपले सर्वस्व संपणार ही भीती भेसूर रूप घेते आहे आणि कुटुंबेच्या कुटुंबे नैराश्येच्या गर्तेत ओढली जात आहेत. लॉक डाऊनच्या काळात तीनशे लोकांनी आत्महत्या केल्या असल्या तरी किती हजार किंवा किती लाख लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेले असतील, याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. कुठे घरखर्च कसा चालवायचा हा प्रश्न, तर कुठे घरभाडे कसे भरायचे ही चिंता. लाखो लोकांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे कोरोना न होताही लोक मृत्यूला कवटाळत आहेत. मानसिक ताणतणावाचे हे बळी रोखायचे कसे? पोटाच्या खळगीचा हा प्रश्न आहे. मानसिक तणाव दूर कसा करावा, याविषयी सोशल मीडियावर येणारे मेसेज वाचून तो दूर होणार नाही. प्रयत्नांची शिकस्त करूनही कोरोनामुळे बळी जात आहेतच, पण कोरोना रोजीरोटी हिरावून बळी घेणार असेल तर ते कसे रोखायचे, यावरही देशपातळीवर मंथन व्हायला हवे.



























































