
>> प्रशांत गौतम
ज्या काळात शिक्षणावर कुणी लिहीत नव्हते, त्या काळात प्राचार्या लीलाताई पाटील यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. या शैक्षणिक लेखनातून त्यांनी शिक्षकांची, पालकांची मनोभूमिका तयार केली. त्या प्रयोगशील शिक्षिकेची शिक्षणयात्रा नुकतीच करवीरनगरीत विसावली. एखाद्या व्यक्तीची बहुपदरी ओळख सांगायची झाली तर लीला पाटील यांचेच नाव आपल्यासमोर येते. लीलाताईंची पहिली ओळख म्हणजे त्या मराठीतील प्रख्यात कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके यांच्या कन्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भाचेसून, दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी होत. या पलीकडे जाऊन जी ओळख निर्माण केली ती म्हणजे प्रयोगशील शिक्षिका आणि बालमानसशास्त्र लक्षात घेऊन लिहिणार्या लेखिका आणि विचारवंत, अशी सांगता येईल. जी त्यांनी आयुष्यभर कायम ठेवली. त्या आधारे त्यांनी बालसाहित्य लेखन आणि शिक्षण क्षेत्रावर आपली ठसठशीत अशी नाममुद्रा उमटवली.
पुण्यात 28 मे 1927 साली जन्म झालेल्या लीलाताईंनी मुंबई विद्यापीठामधून 1947 साली बी.ए. ऑनर्स ही पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठातून बी.एड्. प्रथमश्रेणीत मिळवले. शिक्षण क्षेत्रातली ही प्रगती सुरू असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा पैलू व्यक्त होऊ लागला. या व्यक्त होण्याच्या काळात त्यांना साथ लाभली ती जे.पी. नाईक, प्राचार्य भागवत, डॉ. चित्रा नाईक यांची. त्यांचा प्रेरक सहवास लाभला. 1940 ते 1946 अशी सहा वर्षे त्यांना सेवादलात कार्य करण्याची संधी लाभली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सहभागही घेतला. अशा पोषक वातावरणात त्यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी बहरत गेले. कोल्हापूर शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षा, महिला दक्षता समितीच्या मार्गदर्शक, शिक्षक मंचच्या उपाध्यक्षा, महाराष्ट्र शिक्षक-पालक संघाच्या कार्याध्यक्षा, मनोरमा विश्वस्त कुंजच्या अध्यक्षा असा त्यांच्या सामाजिक कार्याचा परिघ सांगता येईल. यातील महत्त्वाचे म्हणजे आनंद विद्यालय आणि सृजन आनंद शिक्षण संस्थेच्या प्रवर्तक म्हणून त्यांनी जे कार्य करून ठेवले आहे, त्यास तोड नाही. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आलेले अनुभव नक्कीच वेगळे होते. त्यावर आधारित त्यांनी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, मिळून सार्याजणी या मासिकांत वैविध्यपूर्ण लेखन केले. कोल्हापूर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामार्फत, जिल्हा मुख्याध्यापक संघाने बारा-तेरा पुस्तके प्रकाशित केली. पुण्याच्या उन्मेष प्रकाशनानेही त्यांची अनेक पुस्तके छापली. लीलाताई शिक्षण क्षेत्रातील मोठय़ा, अवजड विषयावर कठीण बोलण्यापेक्षा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मुलांच्या वर्गात शोधत असत. त्यांच्यातील प्रयोगशील शिक्षक हा सक्रिय होता. एवढे की, वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा त्या सृजन आनंद विद्यालयात वर्गात येऊन शिकवत असत.
मुलांमधील कुतूहल जागे करणे, त्यांच्यात एखाद्या प्रश्नाविषयीची उत्सुकता निर्माण करणे, पडलेल्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, अशी सृजनची भूमिका आणि वैशिष्टय़े सांगता येतील. अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या असतानाच्या कार्यकाळात त्यांनी नव्या शिक्षकांना घडवण्याचे जे कार्य केले आहे ते कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. प्राचार्यपदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी बालशिक्षण, मूल्यशिक्षण यात अनेक प्रयोग केले. हाडाच्या शिक्षिका, प्रशासक, शिक्षणविषयक महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्त्वचिंतक अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी जे कार्य केले आहे, ते समाजासाठी आणि नवशिक्षकांसाठी सदैव मार्गदर्शनपर ठरेल असे आहे. आजच्या पुस्तकी शिक्षणाच्या धबडग्यात मूल्यशिक्षण हरवत जाते. केवळ पुस्तकी ज्ञान ही शिक्षणपद्धती देत असल्याने विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन होत नाही. विशेष म्हणजे विद्यार्थी जे शिकतो, त्याचा व्यवहाराशी, निसर्गाशी काही संबंध उरत नसतो. मुळात शिकलेला गुणवंत मुलगा व्यवहारात कच्चा राहतो. म्हणजे असे की, विद्यार्थी चौकस व्हायला हवा तसा होत नाही, त्याला प्रश्नही पडत नसल्याने उत्तर शोधण्याचीही बाब नसते. अशा वातावरणात लीलाताईंनी मुलांना घडवण्यासाठी जे काही प्रयोग आपल्या सृजनच्या माध्यमातून केले आहेत, ते बघितले पाहिजेत.
लीलाताईंनी मुलांमध्ये कौशल्य विकास निर्माण केला. पाणी कुठून येते या विषयापासून ते त्याचा वापर आपण कसा करतो, किंवा करावा इथपर्यंतचे संस्कार मुलांवर बिंबवले जातात. स्मशानभूमी कशी असते, चिता कशी धडधडते हेही त्यांनी मुलांना स्मशानात नेऊन प्रत्यक्ष दाखवले. म्हणजे असे की, चार भिंतीच्या बाहेरचे शिक्षण मुलांना दिले की मुलांची चौकस वृत्ती वाढते, अभ्यास एके अभ्यास असा साचेबद्धपणा ठेवला नाही की मुलांमधील सृजनशीलता अधिक गतिमान होऊ शकते. त्यांना हवे तसे फुलू दिले की ते विकसित होतात, असा व्यापक दृष्टिकोन लीलाताई पाटील यांचा असायचा. कौशल्यापलीकडे जाऊन जगता येते, असे शिक्षण मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आनंददायी ठरू शकते, हे त्यांनी ओळखले. शिक्षण, सामाजिक भान आणि सहवेदना किती महत्त्वाची असते, हेही त्यांनी जाणले. लीलाताईंच्या या कार्यास लोकमान्यता आणि राजमान्यताही लाभली होती. लेखिका आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिका त्यांनी शिक्षण, सामाजिक क्षेत्र, बालसाहित्य या क्षेत्रात कार्य करत असताना व्यवस्थित पार पाडल्या. ना. सी. फडके यांची कन्या आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची भाचेसून हे वलय त्यांच्याभोवती असले तरी त्यांनी आपला कार्यप्रवास कर्तृत्वाने पुढे नेला, जो कोल्हापुरात 93 व्या वर्षी आता विसावला आहे.



























































