
नशिबात असेल तर तुम्ही कोण, कुठे आणि काय करता याला महत्व नसते. कारण एका रात्रीत नशीब बदलू शकते याचा अनुभव तंजानिया येथे खाणीत काम करणाऱ्या मजुराला येत आहे. खाणीत खोदकाम करताना मजुराला दोन मौल्यवान दगड सापडले.
सुरुवातीला त्याने सामान्य दगड असतील असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर त्यात वेगळीच चमक असल्याचे दिसून आल्यानंतर त्याने याबाबत सरकारला माहिती दिली. सरकारी अधिकाऱ्यांनी या दगडांची चाचणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. सरकारने या दगडांच्या बदल्यात मजुराला तब्बल 25 कोटी रुपये दिले आहेत. सनिनीयू लैजर असे या मजुराचे नाव आहे. सनिनीयू याची 4 लग्न झाली असून तो 30 मुलांचा बाप आहे.
खाणीत खोदकामादरम्यान सापडलेल्या या मौल्यवान दगडांचे वजन 9 किलो 27 ग्राम आणि 5 किलो 10 ग्राम भरले आहे. तंजानियाचे खाणकाम मंत्री सायमन मसनजिला यांनी यास ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, याआधी एवढ्या मोठ्या आकाराचा टँजेनाईट दगड पाहिलेला नाही. हे रत्न उत्तरेकडील भागात आढळते. याची किंमत कोट्यवधी रुपये असून यास तंजानिया बँकेने खरेदी केले आहे.

























































