सराईत गुंडाला गावठी पिस्तुल, काडतुसांसह अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुंडाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल , एक मॅक्झिन, जिवंत काडतुसं, एक कार आणि मोबाईल असा 5 लाख 36 हजार 200 रूपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नामदेव रामदास बोरनारे असे त्या सराईत गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस शनिवारी रात्री गस्तीवर असताना पोलीस नाईक संतोष शंकर लोंढे यांना खबऱ्याकडून सराईत गुंडाबाबत माहिती मिळाली. नामदेव रामदास बोरनारे कोपरगाव येवला रोडवर साई धाम कमानीजवळ रात्री 9 वाजता दिसला. त्याच्याजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व एक काडतूस, अशी घातक शस्त्र विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक संतोष लोंढे यांनी त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल व 1200 रुपये किमतीचे एक मॅक्झिन व त्यात एक काडतुस, 5 लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी तसेच पाच हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा एम आय कंपनीचा मोबाईल असा एकूण 5 लाख 36 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस नाईक संतोष लोंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव बोरणारे (रा. पाटोदा, ता.येवला, जि. नाशिक) याला अटक करून त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बोरसे करीत आहेत.