
आयआयटीचा लोगो वापरू नका, अशी तंबी देशातील 23 आयआयटी संस्थांनी माजी विद्यार्थ्यांच्या ‘आयआयटी अल्मनाय कौन्सिल’ला दिली आहे. मेगा कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे, तसेच आयआयटी संस्थांसाठी 21 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा करून ही कौन्सिल चर्चेत आली होती.
या कौन्सिलची स्थापना अलीकडेच झाली. कौन्सिलच्या लेटरहेडवर आयआयटीचा लोगो वापरण्यात आला. त्यासाठी कोणतीही लेखी परवानगी कौन्सिलने घेतली नव्हती. कौन्सिलचा कारभार स्वतंत्ररीत्या चालतो आणि त्यात आयआयटी संस्थांची कोणतीही भूमिका नाही, असे 23 आयआयटी संस्थांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. कौन्सिलने आपल्या वेबसाइटवर सर्व आयआयटी संस्थांचे लोगो लावले आहेत. सर्व संस्थांमधील माजी विद्यार्थ्यांची ही संस्था असल्याचा दावाही त्यावर करण्यात आला आहे. कौन्सिलच्या वतीने मोठी कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येत असून, त्यात दरमहिन्याला एक कोटी चाचण्या होतील, असेही कौन्सिलने जाहीर केले होते.


























































