बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. 45 वर्षीय शिल्पाचे विविध प्रकारचे योगासन करणारे व्हिडीओ आपण पाहिले असतील. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून आपण मांसाहार सोडून शाकाहारी झाल्याचे सांगितले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना एक संदेशही दिला आहे.
शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत एक पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणते, खरे तर हा प्रत्येकाचा खासगी निर्णय आहे, मात्र माझ्यासाठी हा निर्णय घेणे कठीण होते. एकवेळ मी हे करू शकत नाही असे मला वाटले होते, मात्र आता यात मला यश आले असून मी आता पूर्णपणे शाकाहारी झाले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे, असे शिल्पाने सांगितले.
पर्यावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून आपण ज्या प्राण्यांना मारून खात आहोत यामुळे कार्बन डायॉक्साईड, मिथेन आणि अन्य विषारी वायू वाढत असून यामुळे जंगल देखील धोक्यात येत आहे, असे शिल्पा म्हणाली.
शाकाहारी बनणे प्राण्यांच्या दृष्टीने देखील चांगले आहे. तसेच यामुळे हृदयाच्या आजारांपासून देखील आपले संरक्षण होते आणि मधुमेह व अन्य आजारांपासून देखील आपण वाचतो, असेही शिल्पा हिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. शाकाहार पर्यावरण आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी योग्य असल्याचे तिने सांगितले. या संदेशासोबत तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती आणि मुलगा विवान शेतात भाज्या तोडताना दिसत आहे.