
कुख्यात गँगस्टर किकास दुबे याच्या एन्काऊंटरनंतर आता आपला नंबर लागतो की काय या भीतीने जबरदस्त घाबरलेल्या गुड्डन त्रिवेदी आणि सोनू तिवारी या आरोपींना थोडा दिलासा मिळाला. कारण बाय रोड नाही, तर विमानाने यूपी पोलीस दोघांना घेऊन जाणार आहेत. त्या दोघांचा ट्रान्झिट रिमांड यूपी पोलिसांना मिळाला.
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी बिकरु गावात त्याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर अंधादुंध गोळीबार केला होता. त्यात आठ पोलिसांचा मृत्यू तर सात पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्या हत्याकांडाप्रकरणी तेथील चौबेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस दुबे आणि त्याच्या हस्तकांचा शोध घेत होते. पोलिसांच्या वाँण्टेड यादीत दुबेबरोबर त्याचे हस्तक गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारी यांचेही नाव होते. दरम्यान, विकास दुबे सापडला आणि पोलिस चकमकीत ठारदेखील झाला. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू युनिट प्रभारी दया नायक व पथकाने विकासचे हस्तक आणि त्याच्यासोबत गुन्हे करून तुरुंगाची हवा खाणारा गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारी या दोघांना ठाण्यात पकडले.
दोघांनाही सोमवारी ठाण्याच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा एन्काऊंटरच्या भितीने धास्तावलेल्या गुड्डनने बाय रोड न नेता विमानाने नेण्यात यावे अशी नवकिलांमार्फत विनंती केली होती. कानपूर शहर पोलिसांनी कोर्टाकडून दोघांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. आता पोलिस दोघांना विमानाने घेऊन जातील.



























































