अखेर चर्चगेट ते डहाणू थेट लोकल धावणार, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी लोकल सेवा सुरू करताना पालघर, बोयसर आणि डहाणूवरून मुंबईत सकाळी सातच्या पहिल्या शिफ्टला पोहचणाऱया नर्सेस आणि इतर निमवैद्यकीय स्टाफचे सकाळच्या नेहमीच्या लोकल बंद केल्याने मस्टर मिस होत होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेने सकाळी 4.50 वाजता ‘मेमू’ सुरू केली परंतु तिचाही बोरिवलीच्या पुढील नर्सेस स्टाफला उपयोग होत नव्हता. अखेर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पाठपुरावा केल्याने डहाणू ते चर्चगेट सकाळी 4.40 वाजताची थेट लोकल सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने मान्य केले आहे.

पालघर, डहाणू येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱया अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी पश्चिम रेल्वेने डहाणू ते विरार आणि विरार ते डहाणू अशा अतिरिक्त दोन ‘मेमू’ फेऱया 16 जुलैपासून चालवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु डहाणू ते बोरिवली पहाटे 5 वाजताची ‘मेमू’ बंद करीत त्याऐवजी 5.40 ची डहाणू ते विरार लोकल चालवली. त्यामुळे पालघर जिह्यातील अत्यावश्यक कर्मचाऱयांची गैरसोय झाल्याने या गाडीची पूर्वीचीच वेळ करण्याची तसेच ‘मेमू’ ट्रेन असल्यामुळे प्रवाशांना पुन्हा विरारला उतरून दुसऱया प्लॅटफॉर्मवर लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. यामुळे बोरिवलीच्या पुढील स्टाफला कार्यालयात वेळेवर पोहोचणे देखील दुरापास्तच होते, त्यामुळे गाडीची वेळ बदलण्याची तसेच थेट लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे केली. खासदार अरविंद सावंत यांनी पाठपुरावा करून वेळ बदलण्यास ‘परे’च्या अधिकाऱयांना भाग पाडले होते. परंतु प्रवाशांची थेट गाडीची मागणी प्रलंबित होती. त्यामुळे खासदार सावंत यांनी डीआरएमकडे पाठपुरावा केला व संबंधित अधिकाऱयांनी डहाणू ते चर्चगेट थेट लोकल उद्यापासून सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.