
आषाढ अमावस्या हा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस व दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. आषाढी अमावस्येला गटारी साजरी केली जाते, म्हणून या दिवसाला खवय्यांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. श्रावण महिन्यातील उपवास सुरू होण्याच्या अगोदर गटारी अमावस्येच्या निमित्ताने घरोघरी कोंबडी व बोकडाचे विविध पदार्थ बनवून चमचमीत जेवणाचा बेत आखला जातो. या दिवशी अनेक अनेक मंडळी पार्ट्यांचे आयोजन करीत असतात, परंतु या वर्षी मात्र कोरोना लॉकडाऊनचा फटका गटारी अमावस्यालाही बसला आहे.
रायगड जिल्ह्यात 15 जुलै ते 26 जुलैपर्यंत कोरोनाचा प्रसार-प्रचार रोखण्याकरिता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी 20 जुलै सोमवार रोजी गटारी अमावस्या आहे परंतु या दिवशी सोमवार आल्याने अनेकांनी गटारी अमावस्या शुक्रवारी किंवा रविवारी साजरी करण्याचे ठरविले होते परंतु या लॉक डाऊन मध्ये चिकन, मटण विक्री करणाऱ्या खाटीकांची दुकाने, किराणा मालाची दुकाने, भाजी विक्रीसह इतर सर्व प्रकारची व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. या बंद मधून औषधांची दुकाने व दूध विक्रीची दुकाने व वगळण्यात आली आहेत.
लॉक डाऊनमुळे कोट्यवधीचा व्यवसाय अडचणीत
ऐन श्रावण महिन्याच्या व गटारी अमावस्याच्या अगोदर घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे कोंबडी व बोकड व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. गटारी अमावस्या निमित्तने कोंबड्यांची व बोकड यांची मोठ्या प्रमाणावर ती विक्री होत असते व त्यामुळे बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते परंतु या लॉक डाऊन मुळे हा कोट्यवधींचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
फक्त पेण तालुक्यातच सुमारे 10 हजार पोल्ट्री फार्म आहेत. या पोल्ट्री फार्म मधून सुमारे 15 लाख कोंबड्यांची मुंबई, ठाणे, रायगड व पालघर येथे विक्री करण्यात येते. एक कोंबडी साधारणतः 5 रुपयाचे खाद्य दिवसाला खात असते. 12 दिवसाच्या लॉक डाऊन मध्ये एक कोंबडी 60 रुपयांंचे अतिरिक्त खाद्य खाणार आहे. परंतु त्याप्रमाणात तिला बाजारात अतिरिक्त भाव मिळणार नाही.
लॉकडाऊनमुळे पोल्ट्री व्यवसायाचे अतोनात नुकसान
सर्वप्रथम कोरोना हा कोंबड्यामुळे पसरण्याच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच गटारीच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे पोल्ट्री व्यवसायाला पुन्हा मोठा आर्थिक फटका बसला आहे. गटारी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरु होतो. त्यानंतर गणपती उत्सव व नवरात्र उत्सव येत असल्याने या कालावधीत लाखो नागरिक मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे गटारी अमावस्या निमित्ताने होणारी कोंबड्यांची विक्री महत्त्वाची असते. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी तर कर्ज काढून गटारी अमावस्या निमित्त माल भरला आहे. लॉक डाऊन मुळे पोल्ट्री व्यवसायाचा अतोनात नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया कराड पोल्ट्रीचे मालक राजेश कराड यांनी दिली
पेण, पनवेल सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात घेतलेल्या लॉकडाऊनमुळे चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद असल्याने पोल्ट्री व्यवसाय वरती सुद्धा लॉक डाऊनचा परिणाम झाला आहे त्याच प्रमाणे बोकडांची फार्मिंग करणाऱ्या फार्मवरतीही शुकशुकाट पसरला आहे. बोकडांच्या विक्रीलाही चाप बसला आहे.
गटारी अमावस्या, 31डिसेंबर व कोजागिरी पौर्णिमा या ठराविक 3 दिवसांमध्येच कोंबडी व बोकडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. वर्षभरात होणाऱ्या एकूण विक्रीच्या 70% विक्री या 3 दिवसात होत असते. गटारी अमावस्येच्या निमित्ताने पेण तालुक्यात सुमारे 600 बोकडांची विक्री होते. परंतु या लॉकडाऊनमुळे सदरचीविक्री होणार नाही व त्यामुळे कोंबडी व बोकड विक्रेत्यांना आर्थिक नुकसान होणार आहे अशी माहिती पेण कसाई युनियनचे सदस्य रियाज बशिर कसाई यांनी दिली.
19 जुलैला कोंबडी व बोकड विक्रीकरीता दुकाने उघडण्याची मागणी
जिल्हा प्रशासनाने 19 जुलै रविवार रोजी किमान एका दिवसाकरीता तरी कोंबडी व बोकड विक्री करिता दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रियाज कसाई यांनी केली. तसेच पाव किलो, अर्धा किलो चिकन व मटण घरपोच करणे परवडण्यासारखे नाही. तसेच आमचे मोबाईल नंबर सर्व ग्राहकांना माहीत नसल्याने आम्हाला ऑर्डर मिळणेही कठीण आहे असेही कसाई यांनी सांगितले. दरम्यान चिकन, मटण, अंडी, किराणामाल व भाजीपाला यांना घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.























































