Corona – गोव्यात आज 196 रूग्णांची नोंद, मृतांचा आकडा 21 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

गोव्यात आज नव्याने 196 रुग्ण सापडले तर 129 जण बरे होऊन घरी गेले. अजुन देखील 1 हजार 317 जण उपचार घेत असून मृतांचा आकडा 21 झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. लॉक डाउन असून देखील खनिज वाहतूक सुरु असल्याचे दिसून आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात आतापर्यंत 3 हजार 304 रुग्ण सापडले असून त्यातील 1 हजार 946 बरे होऊन घरी गेले असले तरी 1 हजार 337 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

झुवारीनगर येथील 67 वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला. ती कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती. त्याशिवाय मडगावमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या नमुन्याची चाचणी केली असता त्याला कोविड असल्याचे निदान झाल्याने मृतांचा आकडा 21 वर गेला आहे.

गोव्यात रेल्वे, रस्ता आणि विमान मार्गे येणाऱ्यांमध्ये देखील कोविड रुग्ण वाढू लागले आहेत. आज असे 131 प्रवासी कोविडग्रस्त आढळले. मांगोर हिलमध्ये 43 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णांच्या संख्येने 417 चा आकडा पार केला. मांगोर हिलनंतर वास्कोत लॉकडाउन न केल्यामुळे राज्यभरात कोविडचा सामुदायिक प्रसार झाल्याने लोक भयभीत झाले आहेत.

मूरगाव तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक झाला असून त्याला आळा घालण्यात सरकारला अपयश आले आहे. सडा येथे 100, बायणा येथे 138, न्यू वाडे येथे 112, झुवारी नगर येथे 192, खारेवाडा येथे 104 रुग्ण असून मृतांमधील 50 टक्के पेक्षा जास्त मूरगाव तालुक्यातील असल्याने तेथील लोकांमध्ये कोविडची दहशत पहायला मिळत आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. कुंकळळी येथे 24, धारबांदोडा येथे 11, खांडोळ्यात 36, लोटलीत 25, राजधानी पणजीत 10, मडगाव मध्ये 25, नेरुल मध्ये 23, मोती डोंगरावर 7, नावेलीत 10, पर्वरीत 18, फोंडयात 45, म्हापशात 37, पेडणेत 18, केपेत 25, शिरोडयात 20, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत 39, वेर्णा येथील ट्यूलिप डायगोनस्टिकमध्ये 139, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 21 आणि उसगावमध्ये 12, बाळळीत 42, चिंबल मध्ये124, कुडतरीत 39 रुग्ण असल्याने कोविड रोखणे सरकारसाठी आव्हान बनले आहे.