पैठणचे खुले कारागृह अन् 18 वर्षांपूर्वीच्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रीनाथ खंडागळे

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या निधनाचे वृत्त आल्यावर त्यांनी केलेल्या पैठण येथील सामाजिक कार्याच्या 18 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कवी तथा साहित्यिक शिवाजी साळुंके यांच्या मुलीला त्यांनी मानसकन्या मानले. हा संवेदनशील कवी 10 वर्षांपूर्वीच कारागृहातून बाहेर पडला आहे. तर मानसकन्या निर्मिती साळुंके पुण्यात वकिली करत आहे.

पैठणच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांनी अनेक कैद्यांना पै. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या पैठण येथील परीक्षा केंद्रातून पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य केले. अनेक कविता संग्रह प्रकाशित केले. कैद्यांची पथनाटय़े तयार करून राज्यभर जनजागृती केली.

साळुंके यांनी वारंवार मुलगी निर्मिती ऊर्फ राणीबाबत केलेल्या चिंतायुक्त उल्लेखानंतर नीला सत्यनारायण यांनी थेट या मुलीची भेट घेतली. तिला थेट स्वत:च्या मुलीप्रमाणे जपले. मानसकन्या मानून पालकत्व स्वीकारले.