
>> दिलीप जोशी
बालकवींच्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ हे खरंच आहे. शतकानुशतकं आपली निसर्गाशी संवाद साधणारी सांस्कृतिक परंपरा श्रावण महिन्याचं स्वागत उत्साहात करत असते. ‘वर्षा’ ऋतुच्या काळात सणासुदीची सुरुवात श्रावण महिन्यापासून होते. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असा चातुर्मासाचा काळ अनेक सण घेऊन येतो. कालाष्टमी, गणपती, नवरात्र आणि दसरा, दिवाळी हे त्यातले मोठे उत्सवी सण.
पावसाने कृपा केली तर अवघा देश हिरवाईने नटतो. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीला गिरीशिखरांवरही हिरवी मखमल पसरते. शेतं तर हिरव्या पिकांनी बहरू लागतात. ज्येष्ठ, आषाढातला पावसाळा तुफानी जोर कमी होऊन तो आता स्थिरावलेला असतो. आषाढी एकादशीच्या वारीनंतर शेतीच्या कामांना वेग येतो. आता नवान्न पौर्णिमेपर्यंत शेतकर्याला उसंत नाही. पेरणी, लावणीपासून सुरू झालेली लगबग आता पिकं वर आली की कोठारात धान्य भरेपर्यंत कितीतरी गोष्टी बारकाईने लक्ष देऊन कराव्या लागतात.
या वर्षी पावसाने सलामी देतानाच ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं उग्र रूप दाखवलं. त्यानंतर मात्र तो बरा पडतोय. राज्याच्या सर्व भागांत समाधानकारक पाऊस झाल्याच्या बातम्या येतायत. महानगरांना पाणीपुरवठा करणारे तलाव भरू लागलेत. हा लेख लिहीत असताना नागपूरला पाणीपुरवठा करणारा अंबाझरी तलाव आणि नगर जिल्ह्यातलं भंडारदरा धरण भरून वाहत असल्याची दृश्यं टीव्हीवर दिसत होती.
एरवी शहरातल्या तरुणाईसाठी आणि मनाने तरुण असलेल्यांसाठीही हा मोसम योग्य ती काळजी घेत सह्याद्रीच्या दर्या-डोंगरात गिर्यारोहण करण्याचा किंवा राज्यातल्या अनेक पावसाळी धबधब्यांचं सौंदर्य न्याहाळण्याचा. आम्ही अजूनही दरवर्षी किमान माथेरानचा पर्जन्यानुभव तरी घेतोय. डोंगरावर वरच्या बाजूला अचानक खाली आलेल्या ढगातला गारवा आणि धूसर स्थिती अनुभवणं आल्हाददायक असतं.
गेल्या वर्षीही अशी एका दिवसाची ट्रिप झालीच होती. ‘कड्यावरून मारीत उड्या, खेळ लतावळथी फुगड्या’ करत सुसाट येणारे छोटे-मोठे शेकडो धबधबे मोहक दिसतात. एका पावसाळ्यात तर आम्ही कर्नाटकातले सगळे धबधबे पाहण्याची सहल काढली होती. गिरसप्पा, जोग फॉल्स हे देशातले मोठे धबधबे. ‘जोग फॉल्स’ हा देशातला बहुधा सर्वात उंचावरून कोसळणारा प्रपात.
या वर्षी त्या सगळ्या निसर्गानंदाच्या आठवणी फोटो पाहत घालवल्या. कारण कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. घर सोडून बाहेर पडणं कठीण, तर पर्यटन कुठलं! सामाजिक आणि व्यक्तिगत स्वास्थ्यासाठी यावेळी संयम बाळगायलाच हवा. संयम बाळगला तसा नियमांचं पालन प्रभावीपणे होईल. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ची नितांत गरज असल्याने सगळ्याच जीवनशैलीत बदल करणे अनिवार्य ठरतंय.
आजच श्रावण महिना सुरू होतोय. त्यानिमित्ताने या काळातल्या उत्साही वातावरणाचं वर्णन करणार्या अनेक कविता आणि मराठी-हिंदी गाणी आठवली. या महिन्याला निसर्गाचं रूप कसं असतं ते बालकवी अचूकपणे सांगतात. ‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ असा ऊन-पावसाचा खेळ आता पाहायला मिळेल. आसपास अगदी काँक्रीटच्या जंगलातही मिळालेल्या छोट्याशा मातीपट्ट्यावर उगवलेलं गवत दिसेल. या गवतपातांची जिद्द फारच प्रबळ. कितीही काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी पावसाच्या पहिल्या सरीबरोबर गवतपाती ठायी ठायी डोकावू लागतातच. अगदी रेल्वेच्या रुळातल्या खडीमध्येही दिसतात. त्यांची ‘मुळी’ कवी यशवंतांच्या शब्दात ‘पाताळापर्यंत रुजलेली’ असते! अर्थात हे तण शेतातलं असो वा रेल्वेतलं, ते काढावंच लागतं.
याच काळात खूपशा पावसाळी भाज्या येतात. कुठेही सहज उगवलेल्या टाकळा किंवा डोंगरभागात होणारी कर्टुली आता दिसू लागतील. निसर्गाशी थोडा परिचय असेल तर अशा अनेक डोंगरी भाज्या समजतील. नागरमोथा, आघाडा, तेरडा अशी पाना-फुलांची आरास मांडणार्या वनस्पती दिसू लागतील. त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं आणि हेलिकॉप्टरसारखे दिसणारे ‘चतुर’ यांचाही हाच काळ.
या वर्षी हे सगळं बघायला बाहेर पडता येत नसलं तरी हे सौंदर्य टिपलेल्या शेकडो फिल्म यू-ट्यूबवर, नेटवर असतील. त्यातूनही खूप माहिती मिळेल. निसर्ग जाणून घेणं हासुद्धा अभ्यासच असतो. फक्त तो नकळत आणि आनंदाने होतो.
हा चातुर्मास जाईल तसा जाईल. पुढच्या वर्षी मात्र कोरोनाचं संकट नक्कीच टळलेलं असेल असं म्हणत राहू या. पुढचा श्रावण छान असेल. ‘कुंकू’ या प्रभातच्या सिनेमात ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे’ नावाचं ऋतुचक्राचं वर्णन करणारं गाणं आहे. त्यातल्या ‘श्रावणी पाऊस हास्याचा पडे’ असा अनुभव पुढच्या वर्षी सर्वांनाच यावा.



























































