मुद्दा –  कोरोना आणि घरची अर्थव्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती जरी समाधानकारक असली तरी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेऊनच जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. लॉक डाऊन व शारीरिक अंतर हा जरी एकमेव उपाय असला तरी आता चार महिने होत आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. शिवाय लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थादेखील मंद झाली आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम कौटुंबिक अर्थव्यवस्थेवरही होत आहेत. काही शहरांत लॉक डाऊन पुन्हा काही दिवसांसाठी वाढवला आहे. आता काही दिवसांतच सण-उत्सवांचे दिवस सुरू होत आहेत. सध्याच्या कोरोना स्थितीत ते साजरे करण्यावर निर्बंध असण्याबाबत काहीच दुमत नाही, पण अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी आर्थिक उलाढाल होणेदेखील गरजेचे आहे. गेले तीन-चार महिने कौटुंबिक अर्थव्यवस्थेचे बजेटसुद्धा कोलमडले आहे. चार माणसांच्या सर्वसामान्य कुटुंबाचा मासिक खर्च अंदाजे चाळीस हजार रुपये गृहीत धरला तर मागील काही महिने हाताला काम नाही, त्यामुळे उत्पन्न नाही. अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंदआहेत. कामगार स्थलांतरीत झाले आहेत. कर्ज व विमा हप्ते, आहेतच. त्यात पगारकपात होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आपले मासिक कौटुंबिक बजेट कसे सांभाळायचे, हा प्रश्न पडला आहे. लॉक डाऊन कालावधीत काही खर्च नक्कीच कमी झाले असले तरी दैनंदिन व मुलाबाळांचे खर्च तर आवश्यकच आहेत. जून आणि जुलै महिन्यात शाळा, कॉलेज शिक्षण यांचा खर्च असतो. तूर्त जरी तो फारसा नसला तरी ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक, लॅपटॉप, इंटरनेट या सेवासुविधा असणे क्रमप्राप्त आहे. तसेच रोज लागणारा किराणा माल, दूध, फळे, भाजीपाला, औषधे, स्वछता सामग्री, वीज बिल, पाणी बिल, घरभाड़े, वैद्यकीय उपचार आदी खर्च न टाळता येण्यासारखे आहेत. काही कंपन्यांनी आधीच पगारकपात केली आहे. तर काहींनी काही सुविधा आणि भत्ते कमी केले आहेत. काही ठिकाणी आर्थिक सवलती बंद केल्या आहेत.  साहजिकच, सामान्य कुटुंबांना साठवलेल्या पुंजीतून हा सगळा घरखर्च करावा लागत आहे. जमा काही नाही आणि नेहमीचे मासिक खर्च टाळता येणे शक्य नाही. त्यातून महागाईही वाढत आहे आणि आपल्याकडे महाग झालेली वस्तू स्वस्त होत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकूणच कौटुंबिक जमाखर्च मांडताना आणि भविष्यासाठी काही तरतूद करावयाची असेल तर हाताला काम व कामाचा मोबादला हा हवाच. या परिस्थितीत दोष कोणाचाच नाही. राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, पण लॉक डाऊनमुळे पुढे काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर गंभीर परिणाम होतील. कौटुंबिक बजेट ढासळत गेले तर त्याचा समाज आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतात. मानसिक ताण वाढून नैराश्येकडे जाणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढेल ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तेव्हा कुटुंबव्यवस्था सुदृढ़ ठेवायची असेल तर लॉक डाऊनला काही पर्याय शोधणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडणार नाही.

कोरोनाने  काय  शिकवले?

>> सुधीर कनगुटकर

कोरोनाचे दुष्टचक्र एखाद्या साडेसातीप्रमाणे मनुष्यप्राण्याच्या मानगुटीवर बसले आहे. कोरोना विषाणूला गरीब-श्रीमंत, लहान-थोर, राजा आणि रंक सारे एकसमान आहेत. एखाद्या खेडय़ातील गल्लीबोळापासून ते महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत कोणताही भेदभाव नाही, परंतु पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहमायेत गुरफटलेले काही मानवी जीव गरीब आणि श्रीमंत असे भेदभाव करत असल्याचे आढळून येते. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळी असे प्रकर्षाने जाणवले. एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात कोरोना विषाणूने शिरकाव करताच त्याच्या दिवसभराच्या क्रिया-प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारित करण्यात येतात. त्यामुळे अनुभवलेल्या संकटाचे स्वरूप ’मियां मूठभर दाढी हातभर’ असे होऊन जाते. लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे झालेले हाल जेवढय़ा प्रभावीपणे उजेडात आणायला हवेत तेवढय़ा प्रमाणात आणले जात नाहीत. सर्व सजीव सृष्टी ईश्वरासाठी एकसमान असते. काही मानवी जीव उगाचच भेदभावाचे ढोल बडवून समाजात अशांती पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच स्तरांवर हानी झाली आहे. मात्र जगातील सर्वच सजीव प्राणी एकाच ईश्वराची लेकरे आहेत, त्यामध्ये कोणताही भेदभाव करता येत नाही असा मौलिक पाठ कोरोना विषाणूने जगासमोर ठेवला आहे.