छप्पर फाड के! दहावीच्या निकालात 18.20 टक्क्यांची विक्रमी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या निकालात यंदा 18.20 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना छप्पर फाड के गुण मिळाले असून राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला आहे. 2015 नंतर यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी 90 हून अधिक आहे. यंदा राज्यातील तब्बल 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असून गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या कित्येक पटीने जास्त आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेला दहावीचा ऑनलाईन निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर बुधवारी जाहीर केला. राज्यभरातून परीक्षेला बसलेल्या 15 लाख 75 हजार 103 विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी पास झाले आहेत.

  • राज्य – 95.30
  • कोकण – 98.77
  • कोल्हापूर – 97.64
  • पुणे – 97.34
  • मुंबई – 96.72
  • अमरावती – 95.14
  • नागपूर – 93.34
  • नाशिक – 93.73
  • लातूर – 93.09
  • संभाजीनगर – 92.00वैशिष्ट्ये
  • 1 लाख 79 हजार 264 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 35 हजार 991 विद्यार्थी उत्तीर्णः निकालाची टक्केवारी 75.86.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के.
  • 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के.
  • लातूर विभागातील सर्वाधिक 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के.
  • 27 शाळांचा निकाल शून्य टक्के; लातूरात सर्वाधिक 9 तर मुंबईतील 3 शाळा; कोकणात एकही नाही.

दृष्टिक्षेप

  • 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के
  • 83,262 विद्यार्थी 90 टक्क्यांवर
  • 4,55,869 विद्यार्थ्यांना 75 टक्के
  • 5,50,809 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी
  • 3,30,588 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी
  • 80,335 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी
  • 73,998 विद्यार्थी नापास

कोकण पॅटर्न कायम; मुलीच हुशार

यंदाही कोकण विभागाने तब्बल 98.77 टक्के निकालासह बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 96.91 तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी अधिक आहे. सर्वात कमी निकाल संभाजीनगर विभागाचा (92 टक्के) लागला आहे.

प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद मोठा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. या टप्प्याकर प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद निश्चित मोठा असतो. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही दिलासा दिला. ते म्हणाले, काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल, गरज असेल, ती फक्त आणखी जोमाने प्रयत्न करण्याची. त्यासाठीही शुभेच्छा.