
पालिका मुख्यालयातील दवाखाना आता अद्ययावत होणार असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह दोन ऍम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात येणार आहेत. मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल या मागणीची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
पालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील एका कर्मचार्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना 29 जुलै रोजी घडली. संबंधित कर्मचारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत असतानाच प्रकृतीचा त्रास सुरू झाला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होता. आपत्कालीन किभागात माहिती देऊनही अर्ध्या तासाहून जास्त वेळाने रुग्णवाहिका आली. यानंतर त्यांना पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सायंकाळी निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यालयात असणारा दवाखाना अद्ययावत करावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. यानुसार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी तातडीने सुविधा निर्माण करण्याचे आदेश आयुक्तांनी वेलरासू यांना दिल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.
… म्हणूनच घेतला निर्णय
पालिका मुख्यालयात महापौरांसह पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध खात्यांचे प्रमुख, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, सभागृह नेते विरोधी पक्षनेते यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत सुविधा सुरू कराव्यात अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.


























































