
हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती तसेच त्यांच्यावर मेंदूतील गाठीमुळे शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. लष्कराच्या RR रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. असं असताना गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती.
दिल्लीतील काँग्रेसच्या एका नगरसेविकेने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजलीही वाहून टाकली. तिने केलेल्या ट्विटमध्ये प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांना टॅग करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या नगरसेविकेने श्रद्धांजली वाहिल्याचं दिसताच प्रणब मुखर्जींच्या मृत्यूची अफवा आणखीनच जोरात पसरली. मृत्यूचे वृत्त खोटे असल्याचं कळाल्यानंतर या नगरसेविकेने आपले ट्विट डिलीट करून टाकले. प्रणब मुखर्जी यांच्या मुलाने ट्विट करत त्यांचे वडील जिवंत असल्याचे सांगितले. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवर ते चांगलेच संतापले होते. अशा खोट्या बातम्या अफवा पसरवणाऱ्यांमुळे हिंदुस्थानातील माध्यमे ही खोट्या बातम्यांची फॅक्टरीच झाल्याचे त्यांनी म्हटले.
My Father Shri Pranab Mukherjee is still alive & haemodynamically stable !
Speculations & fake news being circulated by reputed Journalists on social media clearly reflects that Media in India has become a factory of Fake News .— Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 13, 2020
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही आपण अफवेला बळी पडल्याचे कबूल करत माफी मागितली.
My deep deep apologies for falling for fake news being circulated on Pranab Mukherjee passing away. I am deeply distraught for falling for this fake news.. it was unprofessional of me to not reconfirm it before tweeting. Apologies to all.. and prayers with the family..
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) August 13, 2020
प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा हिने देखील ट्विट करून आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या अफवा पसरवणाऱ्यांना आणि खासकरून माध्यमांना ठणकावून सांगितलंय की मला फोन करू नका कारण मला रुग्णालयातून येणारी माहिती मिळवण्यासाठी फोन बिझी ठेवून चालत नाही.
Rumours about my father is false. Request, esp’ly to media, NOT to call me as I need to keep my phone free for any updates from the hospital
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) August 13, 2020
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली नव्हती ज्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रणब मुखर्जी यांचे वय सध्या 84 वर्षे असून त्यांनीच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्याला कोरोना झाल्याचे ट्विट केले होते. आपल्या संपर्कात जे कोणी आले होते त्यांनी क्वारंटाईन व्हावे आणि कोरोना चाचणी करावी असे आवाहनही केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन तब्येतीबाबत चौकशी केली होती. मुखर्जी यांनी सोमवारी आपली कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या फोनवरून चर्चा केली होती.
























































