आतापर्यंत 500 हून जास्त जणांनी केले प्लाझ्मा दान; पालिकेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लाझ्मा दान मोहिमेत आतापर्यंत 500 हून जास्त लोकांनी प्लाझ्मा दान करून कोरोनाविरोधात लढाईत योगदान दिले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लसीवर संशोधन सुरू आहे. रशियाने कोरोनावरील लस बनवण्याचा दावा केला आहे. तर हिंदुस्थानात दुसर्या आणि तिसर्या टप्प्यावरील लसीसाठी मानवी चाचणी लवकरच सुरू होणार आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला कोरोनामुक्त करण्यात प्लाझ्मा थेरपी उपयोगी पडत आहे. प्लाझ्मा दानची प्रक्रिया ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पार पडते. कोरोनामुक्त व्यक्तीची चाचणी करून ती व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरली तर त्याचे प्लाझ्मा घेतले जाते. मात्र, त्यासाठी व्यक्ती निरोगी असावी लागते. त्याला इतर कोणतेही आजार असतील तर ती व्यक्ती प्लाझ्मा दानासाठी अपात्र ठरवली जाते. पात्र ठरलेल्या व्यक्तीकडून नायर, शीव, केईएम, कस्तुरबा, जे. जे. रुग्णालयातही प्लाझ्मा गोळा केले जातात.

गणेशोत्सव मंडळांचे योगदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनानंतर, ठिकाठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून प्लाझ्मा दान मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी पालिकेच्या सायन, केईएम, नायर रुग्णालयातील डॉक्टर सहकार्य करत आहेत. या मोहिमेत पात्र झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात बोलावून प्लाझ्मा गोळा केला जातो. प्लाझ्मा गोळा केल्यानंतर ठरावीक कालावधीतच त्याचा थेरपीसाठी वापर करणे आवश्यक असते. धारावीत पालिकेतर्फे तसेच ठिकठिकाणच्या मोठया गणेशोत्सव मंडळांकडून प्लाझ्मा दान मोहिमेसाठी वारंवार आवाहन केले जात आहे.