ई पास रद्द करा, केंद्रीय सचिवांचे राज्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात अनलॉक तीनमधील मार्गदर्शक तत्वांप्रमाणे राज्याबाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवासी व मालवाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी किंवा ई पासची गरज नाही असे पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी देशातल्या सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे.

देशात अनलॉक तीन नुसार अनेक निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याबाहेर तसेच राज्यअंतर्गत ई पासचे निर्बंध नकोत असे या पत्रात नमूद केले आहे. अनलॉक तीनच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आंतराज्य व जिल्ह्यांतर्गत प्रवास व मालवाहतुकीसाठी स्वतंत्र परवागी, मंजुरी किंवा ई-पासची गरज नसल्याचे या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

राज्यात लवकरच निर्णय
राज्यांतर्गत व जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीवरील निर्बंध उठवण्याबाबत सरकारने दखल घेतली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.