
नाशिककरांना औषधी गुणधर्माच्या रानभाज्या, तसेच सेंद्रिय शेतमाल उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी रानभाज्या व सेंद्रिय भाज्या महोत्सव पार पडला. त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अवघ्या 3 तासात 28 हजार रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली. आता दर रविवारी पंचायत समिती आवारात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी. ग्रामीण भागातील बचत गट व शेतकरी यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्र्यंबकरोडवरील पंचायत समिती आवारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यात 13 महिला स्वयंसहाय्यता समूह व 3 शेतकरी उत्पादक गट सहभागी झाले होते.
रानभाज्या आणि इतर सेंद्रीय भाज्यांचा हा महोत्सव आता प्रत्येक रविवारी नाशिक पंचायत समिती आवारात भरवण्यात येणार आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, गटविकास अधिकारी सारिका बारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद मेढे आदींनी परिश्रम घेतले.























































