तो हिंदुस्थानविरोधी, चीन आणि तुर्कीसाठी लाडका, आमीर खानवर संघाच्या मुखपत्रातून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेणारा अभिनेता आमीर खान याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आमीर खान हा हिंदुस्थानविरोधी असून तो चीन आणि तुर्कीसाठी लाडका असल्याची टीका संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आली असून ‘ड्रॅगन का प्यार खान’ या शिर्षकाखाली आमीरचा समाचार घेण्यात आला आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली आहेत. दुसरीकडे काही अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणाऱ्या चीन आणि तुर्की सारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दात या लेखात आमीरवर टीका करण्यात आली आहे. हिंदुस्थानात एखाद्या अभिनेत्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात आणि यशाच्या शिखरावर पोहचवितात. तेव्हा त्याचा धर्म पाहिला जात नाही. ते कलाकाराचे कौतुक करतात. मात्र जेव्हा अशी व्यक्ती देशातील लोकांना ढेंगा दाखवून त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात आधी धर्म नंतर देशासाठी जिहादी विचारसरणी दाखवू लागते किंवा थोड्याच्या पैशांसाठी शत्रू देशाच्या इशाऱ्यावर नाचू लागते. तेव्हा चीड येते, अशा शब्दात आमीरवर टीका करण्यात आली आहे.