रविवार पेठेत घरफोड्या करणारा सराईत अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील मध्यवर्ती रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी अटक केले. विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय 26, रा. कुदळवाडी, चिखली )असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत विविध प्रकारचे तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत.

रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. त्यानुसार फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. चिखली परिसरातील कुदळवाडीकडे जाणाऱ्या एका पेट्रोलपंपावर आरोपी मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सयाजी चव्हाण आणि आकाश वाल्मिकी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास उर्फ विकीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चौकशीत साथीदाराच्या मदतीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, मोहन दळवी, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील अधिक तपास करीत आहेत.